मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  तन्मय अग्रवालच्या १४७ चेंडूत ३०० धावा, हैदराबादने पाडल्या ४८ षटकात ५२९ धावांचा पाऊस

तन्मय अग्रवालच्या १४७ चेंडूत ३०० धावा, हैदराबादने पाडल्या ४८ षटकात ५२९ धावांचा पाऊस

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 26, 2024 08:14 PM IST

Tanmay Agarwal Ranji Trophy 2023-24 : हैदराबादचा सलामीवीर फलंदाज तन्मय अग्रवालने वादळी त्रिशतक ठोकले आहे. तन्मयने अरुणाचल प्रदेशच्या गोलंदाजांची जबरदस्त धुलाई करत अवघ्या १४७ चेंडूत ३०० धावा पूर्ण केल्या.

Tanmay Agarwal Ranji Trophy
Tanmay Agarwal Ranji Trophy

tanmay agarwal scored fastest triple century : भारतात सध्या रणजी ट्रॉफीचा थरार सुरू आहे. या स्पर्धेतील एका सामन्यात अरुणाचल प्रदेश आणि हैदराबाद यांच्यात लढत सुरू आहे. या सामन्यात अरुणाचल प्रदेशचा

हैदराबादचा सलामीवीर फलंदाज तन्मय अग्रवालने वादळी त्रिशतक ठोकले आहे. तन्मयने अरुणाचल प्रदेशच्या गोलंदाजांची जबरदस्त धुलाई करत अवघ्या १४७ चेंडूत ३०० धावा पूर्ण केल्या. तो आता वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारा याचा नाबाद ५०१ धावांचा विक्रम मोडण्याच्या जवळ आहे.

प्रथम श्रेणीत सर्वात वेगवान त्रिशतक

या सामन्यात तन्मय अग्रवालने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत १६० चेंडूत ३३ चौकार आणि २१ षटकारांच्या मदतीने नाबाद ३२३ धावा केल्या आहेत. या खेळीनंतर तन्मय प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात जलद त्रिशतक झळकावणारा खेळाडू ठरला आहे. त्याने अवघ्या १४७ चेंडूत ३०० धावांचा टप्पा गाठला होता.

प्रथम श्रेणीत सर्वात वेगवान द्विशतक

केवळ तिहेरीच नाही तर तन्मय अग्रवालने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात जलद द्विशतक झळकावणारा खेळाडूही ठरला. त्याने अवघ्या ११९ चेंडूत आपले द्विशतक पूर्ण केले होते. आतापर्यंत २१ षटकार ठोकणाऱ्या तन्मयने रणजी ट्रॉफीच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही केला आहे.

पहिल्या विकेटसाठी ३४५ धावांची भागिदारी

अरुणाचल प्रदेश आणि हैदराबाद यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्याच्या पहिल्याच दिवशी तन्मयने सर्वात वेगवान त्रिशतक झळकावण्याचा पराक्रम केला. तन्मयला या खेळीत कर्णधार राहुल सिंग गेहलोतने चांगली साथ दिली. गेहलोतने १०५ चेंडूत २६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १८५ धावांची खेळी केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ३४५ धावांची भागीदारी केली.

४८ षटकात ५२९ धावांचा पाऊस

तत्पूर्वी, या सामन्यात हैदराबादने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी अरुणचाल प्रदेशला पहिल्या डावात ३९.४ षटकात १७२ धावांवर गारद केले.

प्रत्युत्तरात हैदराबादने अवघ्या ४८ षटकात १ बाद ५२९ धावांचा पाऊस पाडला आहे. अभिरथ रेड्डी आणि तन्मय अग्रवाल नाबाद परतले आहेत. अभिरथने २४ चेंडूत २ चौकारांच्या मदतीने १९ धावा केल्या आहेत.

ब्रायन लाराचा विक्रम मोडण्याची संधी

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावा करण्याचा विक्रम ब्रायन लाराच्या नावावर आहे. लाराने प्रथम श्रेणीत नाबाद ५०१ धावा केल्या होत्या. आता अरुणाचल प्रदेशचा तन्मय हा विक्रम मोडू शकतो. तन्मय ज्या वेगाने फलंदाजी करत आहे, ते पाहता तो दुसऱ्या दिवशी अवघ्या काही चेंडूंमध्येच लाराचा विक्रम मोडू शकतो.

WhatsApp channel