भारतीय संघ सध्या शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. येथे आज (७ जुलै) उभय संघांमध्ये ५ टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकून प्रथम फंलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर टीम इंडियाचा युवा सलामीवीर अभिषेक शर्माने शतक ठोकले आहे. त्याने आपल्या करिअरच्या दुसऱ्याच सामन्यात शतकी खेळी साकारली.
अभिषेक शर्माने अवघ्या ४६ चेंडूत शतक झळकावले. त्याच्या बॅटमधून ७ चौकार आणि ८ षटकार आले. मात्र, शतक झळकावल्यानंतर पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला.
झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजीला आला. यावेळी अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल सलामीला आले. गिल अवघ्या २ धावा करून बाद झाला. पण अभिषेकने चमत्कार केला. त्याने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांचा समाचा घेतला. अभिषेकने ४६ चेंडूंचा सामना करत १०० धावा केल्या. यादरम्यान त्याने ७ चौकार आणि ८ षटकार मारले.
अभिषेकने आपल्या T20 कारकिर्दीतील पहिले शतक झळकावण्यासाठी सर्वात कमी सामने खेळले. याबाबतीत विराट कोहली, रोहित शर्मा आणि केएल राहुलसह अनेक दिग्गज मागे राहिले.
भारतासाठी सर्वात कमी सामने खेळताना पहिले टी-20 शतक ठोकण्याचा विक्रम दीपक हुडाच्या नावावर होता. तिसऱ्या सामन्यात त्याने शतक केले होते. पण अभिषेकने दुसऱ्याच सामन्यात ही कामगिरी केली. शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांना कारकिर्दीतील सहाव्या सामन्यात शतके झळकावता आली.
टीम इंडियासाठी दुसऱ्या टी-२० सामन्यात शतक झळकावण्याचा पराक्रम अभिषेकपूर्वी कोणीही करू शकला नव्हता. टीम इंडियाचा दिग्गज कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीसुद्धा हे काम करू शकले नाहीत.
टीम इंडियासाठी टी-20 सामन्यात शतक झळकावणाऱ्या सर्वात तरुण खेळाडूंच्या यादीत अभिषेक चौथ्या स्थानावर आहे. या यादीत यशस्वी पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने वयाच्या २१ वर्षे २७९ दिवसांत शतक झळकावले. शुभमन दुसऱ्या क्रमांकावर आहे. सुरेश रैना तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर अभिषेक चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने २३ वर्षे ३०७ दिवस वय असताना टीम इंडियासाठी टी-20 शतक झळकावले.
दरम्यान, मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. अशाप्रकारे झिम्बाब्वे मालिकेत १-0 ने पुढे आहे.