सोशल मीडियाच्या खासकरून व्हॉटसॲपच्या माध्यमातून आर्थिक घोटाळे होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक हायप्रोफाईल सेलिब्रिटी या फ्रॉडला बळी पडत आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यालाही नुकताच याचा अनुभव आला. मांजरेकर याने नुकताच सोशल मीडियावर एका फसव्या व्यक्तीशी घडलेला अनुभव शेअर केला आहे.
क्रिकेटपटू, समालोचक संजय मांजरेकर याला त्याच्या व्हॉटसॲपवर संपर्क यादीत सेव्ह असलेल्या मित्राच्या नंबरवरून मॅसेज आला. मला २५ हजार रुपयाची तत्काळ गरज असल्याचा तो संदेश होता. मात्र या मित्राचा नंबर हॅक झाला असल्याची माहिती संजय मांजरेकरला आधीपासून होती. त्यामुळे यात काहीतरी गडबड असल्याचे त्याच्या लक्षात आले. मग संजय मांजरेकर याने एक शक्कल लढवली. घोटाळेबाजाला त्याने मागितलेल्या रकमेच्या १० पट अधिक रक्कम देऊ केली. त्यानंतर मात्र घोटाळेबाजाने संजय मांजरेकरला काहीही उत्तर दिले नाही. संजय मांजरेकर यांनी 'एक्स' या सोशल मीडियावर हे आलेले अनुभव शेअर केले आहे.
संजय मांजरेकर लिहितो, ‘एका ओळखीच्या व्यक्तीकडून व्हॉटसॲपवर २५ हजार रुपयाची मागणी करणारा मेसेज आला. त्याचा नंबर हॅक झाला आहे हे माहीत होतं. तरी मी उत्तर दिले. त्याला सांगितले की मी पैसे कसे पाठवायचे आहे? जीपे ओके? पैसे मिळाल्यानंतर स्क्रीन शॉट पाठव असं मी सांगितले. मात्र त्याला नकार देण्यात आला. मी म्हणालो, मी तुम्हाला २५ हजाराऐवजी अडीच लाख पाठवू का? त्यानंतर मेसेज येणेच बंद झाले.’
सायबर फ्रॉड करणाऱ्या गुन्हेगारांसाठी व्हॉटसॲप हे अद्ययावत साधन बनले आहे. भारतात याचे प्रमाण भयंकर वाढले आहे. केंद्र सरकारने गेल्या वर्षी व्हॉटसॲपची मूळ कंपनी असलेल्या मेटा प्लॅटफॉर्म्सला या घोटाळ्यांवर तोडगा काढण्यासाठी विनंती केली होती. यावरून या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात येते. सायबर गुन्हेगार एखाद्याचे व्हॉटसॲप हॅक करण्यासाठी त्यांना एक ओटीपी पाठवतात. नंतर फोनधारकाला खोट्या नावाने किंवा बॅंक अधिकाऱ्याच्या नावाने फोन करून पाठवलेला ओटीपी क्रमांक जाणून घेतात. अशाप्रकारे सायबर गुन्हेगारांना त्या व्यक्तीच्या व्हॉटसॲप अकौंटचा ताबा मिळतो. त्यानंतर स्कॅमर्स मूळ युजर असल्याचे भासवून युजर्सच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील लोकांची फसवणूक करतात.
संबंधित बातम्या