भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील दुलीप ट्रॉफी २०२४ चे सामने खेळवले जात आहेत. यावेळी ही स्पर्धा खूपच खास आहे, कारण टीम इंडियाचे जवळपास सर्वच स्टार खेळाडू सध्या या स्पर्धेत खेळत आहेत. या स्पर्धेत खेळाडू चांगली कामगिरी करून भारतीय संघात स्थान मिळवण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे निवडकर्त्यांना नवीन प्रतिभा शोधण्यासही मदत होईल.
इतकेच नाही तर बीसीसीआयने नुकत्याच सुधारित केलेल्या देशांतर्गत वेतन रचनेमुळे खेळाडूंनाही मोठा फायदा होणार आहे. दुलीप करंडक स्पर्धेतील खेळाडूंचे पगार नेमके किती असतील हे माहीत आपण येथे जाणून घेणार आहोत. २०२३ पासून दुलीप ट्रॉफीच्या बक्षीस रकमेतही वाढवण्यात आली आहे.
यापूर्वी दुलीप ट्रॉफीच्या बक्षिसाची रक्कम ५० लाख होती, परंतु सध्याच्या संरचनेत विजेत्याला १ कोटी रुपये आणि उपविजेत्याला ५० लाख रुपये मिळतील.
नवीन देशांतर्गत वेतन रचनेनुसार, सध्या ४१ किंवा त्याहून अधिक रणजी ट्रॉफीचे सामने खेळलेल्या खेळाडूंना प्रति सामन्यात दिवसाला ६०,००० रुपये मिळतात. दुलीप ट्रॉफीचे सामने ४ दिवसांचे असतात.
यानंतर २१-४० रणजी सामने खेळलेल्या खेळाडूंना प्रति दिवशी ५०,००० रुपये आणि २० किंवा त्यापेक्षा कमी सामने खेळलेल्या खेळाडूंना प्रति दिवस ४०,००० रुपये मिळतात. त्यामुळे सध्या दुलीप ट्रॉफीमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना त्यांच्या रणजी ट्रॉफीतील कामगिरीच्या आधारे रक्कम मिळणार आहे.
भारत अ विरुद्ध धमाकेदार १८१ धावांची खेळी करून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या मुशीर खान सारख्या खेळाडूला त्याच्या ५ रणजी ट्रॉफी सामन्यांच्या आधारे प्रति दिवस ४०,००० रुपये मिळतील. तर, या पगाराच्या रचनेनुसार, जर त्याने तीनही चार दिवसीय सामने खेळले तर त्याला जास्तीत जास्त ४,८०,००० रुपये मिळू शकतात.
सध्याच्या वेतन रचनेवर आधारित, एक खेळाडू दुलीप ट्रॉफी २०२४ मध्ये प्रत्येक सामन्याचे चारही दिवस खेळून जास्तीत जास्त ७,२०,००० रुपये कमवू शकतो.