मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  मुंबईतील मरिन ड्राइव्हवर लाखो लोक कसे जमले? रोहित शर्माचं 'ते' ट्वीट ठरलं कारण

मुंबईतील मरिन ड्राइव्हवर लाखो लोक कसे जमले? रोहित शर्माचं 'ते' ट्वीट ठरलं कारण

Jul 05, 2024 03:43 PM IST

टी-२० वर्ल्डकप विजयाच्या ५ दिवसानंतर टीम भारतात परतली. यानंतर टीम इंडियाच्या चाहत्यांनी अगदी जल्लोषात आणि लाखोंच्या गर्दीने स्वागत केले. आधी दिल्ली आणि नंतर मुंबई या दोन्ही मोठ्या शहरांमध्ये चाहत्यांची मोठी गर्दी होती.

रोहित शर्माने बोलावलं, चाहते जीव धोक्यात घालून आले, मुंबईत लाखो लोक कसे जमले?
रोहित शर्माने बोलावलं, चाहते जीव धोक्यात घालून आले, मुंबईत लाखो लोक कसे जमले?

कालचा म्हणजे गुरुवारचा (४ जुलै) दिवस टीम इंडियाच्या नावावर राहिला. काल टीम इंडिया बार्बाडोसहून दिल्लीला पोहोचली आणि तिथून मुंबईत आली आणि त्यानंतर वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियाचा जल्लोष सोहळा पार पडला. हे सगळे क्षण खूप खास होते.

बार्बाडोसच्या मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने (२९ जून) दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. या सामन्यानंतर तेथे आलेल्या चक्रीवादळामुळे टीम इंडिया लगेच मायेदशी परतू शकली नाही.

जवळपास ३ लाखांचा जनसागर

टी-२० वर्ल्डकप विजयाच्या ५ दिवसानंतर टीम भारतात परतली. यानंतर टीम इंडियाच्या चाहत्यांनी अगदी जल्लोषात आणि लाखोंच्या गर्दीने स्वागत केले. आधी दिल्ली आणि नंतर मुंबई या दोन्ही मोठ्या शहरांमध्ये चाहत्यांची मोठी गर्दी होती.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईतील विजयी मिरवणुकीला जवळपास ३ लाख लोकांचा जनसागर गोळा झाल्याचे बोलले जात आहे. दिवसभरात लाखो लोक एकत्र होणे, याचेही अनेकांना आश्चर्य वाटत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना या इव्हेंटची माहिती देण्यात आली होती.

रोहित आणि जय शाह यांचे लोकांना आमंत्रण

विशेष म्हणजे, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी चाहत्यांना विजयोत्सवात सामील होण्याचे आमंत्रण दिले होते.

"ट्रॉफी घरी येत आहे…आम्हाला तुमच्यासोबत या क्षणाचा आनंद लुटायचा आहे,चला तर मग ४जुलै रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून मरीन ड्राइव्ह आणि वानखेडे येथे विजय परेड करून हा विजय साजरा करूया." बार्बाडोसहून भारताच्या दिशेने प्रवास सुरू झाल्यानंतर रोहितने अशी पोस्ट केली होती.

या पोस्टनंतर चाहत्यांना टीम इंडियाच्या आगमनाची प्रतीक्षा होती. आणि जेव्हा टीम देशाच्या भूमीवर उतरली, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी चाहते आतुर झाले होते. टीम इंडिया मुंबईत पोहोचताच लाखो चाहते जीव धोक्यात घालून रस्त्यावर उतरले. मरीन ड्राइव्हवर लोकांची तुडूंब गर्दी दिसत होती. वर्ल्ड चॅम्पियन्स पाहण्यासाठी प्रत्येकजण आतुर दिसत होता.

रोहित शर्माचे हे आमंत्रण चाहत्यांच्या हृदयाला भिडले. ते त्यांच्या चॅम्पियन्सना पाहण्यासाठी आतुर झाले होते, अशा स्थितीत टीम इंडिया मुंबईत दाखल होताच सगळीकडे फक्त चाहतेच दिसत होते. मरीन ड्राईव्ह असो की वानखेडे… जणू संपूर्ण मुंबई ठप्प झाली होती.

लोकांना हाथरसच्या घटनेचा विसर

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये गर्दीमुळे एक मोठी घटना घडली होती, ज्यामध्ये १२१ लोकांचा मृत्यू झाला. पण या गोष्टी विसरून वर्ल्ड चॅम्पियन्सचा सन्मान करण्यासाठी लोक रस्त्यांवर एकत्र आले. टीम इंडियाच्या विजयाचा जयजयकार सर्वत्र घुमू लागला.

चाहत्यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे कटआउट्स आणले होते. चाहत्यांचा वेडेपणा इतका की एकेवळ तर टीम इंडियाचा विजय रथही गर्दीत अडकला. यानंतर पोलिसांना चाहत्यांना हटवून ओपन बसला बाहेर काढावे लागले.

केवळ मुंबईतूनच नाही तर देशभरातून क्रिकेटवेडे मरीन ड्राइव्हला आले होते. दुपारनंतर तर परिस्थिती अशी बनली, की मुंबई पोलिसांना त्या दिशेने जाऊ नका, असे आवाहन लोकांना करावे लागले. कारण तिथे पाय ठेवायलाही जागा नव्हती. पण तरीही चाहते ऐकायला तयार नव्हते.

WhatsApp channel