जसप्रीत बुमराह हा सध्या सर्व प्रकारच्या क्रिकेटमधील नंबर वन गोलंदाज आहे. आपल्या कर्तृत्वाचा झेंडा त्याने जगभर फडकवला आहे. सध्याच्या क्रिकेटच्या युगात बुमराह हा जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज असल्याचे अनेक दिग्गजांचे मत आहे.
पण जसप्रीत बुमराह याचा शोध कसा लागला, हे तुम्हाला माहीत आहे का? आता याचा खुलासा टीम इंडियाचे माजी हेड कोच जॉन राईट यांनी केला आहे. जॉन राईट यांनीच बुमराह याला मुंबई इंडियन्सपर्यंत पोहोचवले होते. बुमराहच्या यशात मुंबई इंडियन्सचा मोठा वाटा आहे.
जॉन राइट यांनी २०१३ मध्ये एका देशांतर्गत टी-20 सामन्यादरम्यान जसप्रीत बुमराह याला पहिल्यांदा पाहिले होते. अहमदाबादमध्ये खेळल्या जात असलेल्या त्या सामन्यात बुमराह मुंबईविरुद्ध गुजरातकडून खेळत होता.
जॉन राईट यांनी सांगितले की "मी त्या मुलाला गोलंदाजी करताना पाहिले, तो सर्व १२ चेंडू यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हाच मला वाटले की मी यापूर्वी अशा प्रकारचे काही पाहिले नव्हते. तो वेगवान होता आणि अचूक होता."
यानंतर राइट यांनी गुजरातचा कर्णधार पार्थिव पटेलकडून बुमराहची माहिती घेतली. पार्थिव म्हणाला तो बूम आहे. यानंतर आम्ही लगेच बुमराहला मुंबई इंडियन्ससाठी साईन केले. त्यावेळी तुम्हाला आयपीएल लिलावातूनच खेळाडू घेण्याची गरज नव्हती.
यानंतर सराव सत्रादरम्यान जॉन राइट यांनी बुमराहला सचिन तेंडुलकरविरुद्ध गोलंदाजी दिली. सरावानंतर सचिनने राइटला विचारले की हा मूलगा कोण आहे? त्याचे चेंडू ओळखणे कठीण आहे.
राईट पुढे म्हणाले, "चांगली सुरुवात असूनही, बुमराहला त्याच्या सुरुवातीच्या हंगामात अडचणींचा सामना करावा लागला, कारण त्याने २०१३ मध्ये फक्त काही सामनेच खेळले होते. हे एका रात्रीत मिळालेले यश नव्हते.
त्यानंतर २०१४ मध्ये बुमराह मुंबईसाठी महत्त्वाचा गोलंदाज म्हणून उदयास आला. बुमराहला शोधण्यात जॉन राइटसोबत मुंबई इंडियन्सनेही महत्त्वाची भूमिका बजावली. मुंबई इंडियन्समध्ये खेळल्यानंतरच बुमराहला टीम इंडियात सामील होण्याचे दरवाजे खुले झाले होते.
संबंधित बातम्या