India WTC 2025 Final Qualification Scenario : न्यूझीलंडला पहिल्यांदाच भारतात कसोटी मालिका जिंकली आहे. टॉम लॅथमच्या संघाने टीम इंडियाला सलग दुसऱ्या कसोटीत ११३ धावांनी धुळ चारली आहे. न्यूझीलंडने बंगळुरूत झालेल्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा ८ विकेट्सनी धुव्वा उडवला होता. आता पुणे कसोटीतही न्यूझीलंडने भारताचा सहज जधुव्वा उडवला.
तीन सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. यामुळे टीम इंडियाच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये पोहोचण्याच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. पण पुणे कसोटी हरल्यानंतरही भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर कायम आहे.
पण आता फायनलची शर्यत पूर्वीपेक्षा खूपच रंजक झाली आहे. आता भारताला न्यूझीलंडविरुद्ध तिसरा सामना खेळायचा आहे आणि त्यानंतर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला जायचे आहे. अशा परिस्थितीत, भारत WTC फायनलमध्ये जाण्याची समीकरणे काय आहेत हे जाणून घेऊया?
टीम इंडियाचा न्यूझीलंडविरुद्धचा तिसरा कसोटी सामना १ नोव्हेंबरपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू होत आहे. त्यानंतर २२ नोव्हेंबरपासून बॉर्डर-गावसकर ट्रॉफी सुरू होणार असून, त्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ कसोटी सामने खेळवले जाणार आहेत.
सध्याच्या परिस्थितीबद्दल बोलायचे झाल्यास, टीम इंडिया अजूनही ६२.८२ गुणांच्या टक्केवारीसह पहिल्या स्थानावर आहे, तर दुसऱ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाची टक्केवारी ६२.५ आहे. म्हणजे आणखी एका पराभवानंतर भारताची दुसऱ्या स्थानावर घसरण होईल.
आता भारतीय संघाला WTC च्या फायनलपूर्वी एकूण ६ कसोटी सामने खेळायचे आहेत. भारताला कोणतीही अडचण न येता किंवा इतर संघांच्या सामन्याच्या निकालावर अवलंबून न राहता अंतिम फेरीत जायचे असेल तर पुढील ६ मध्ये किमान ४ विजय नोंदवावे लागतील.
जर टीम इंडियाने शेवटच्या कसोटीत न्यूझीलंडचा पराभव केला, तर रोहित आणि कंपनीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध किमान तीन सामने जिंकावे लागतील. भारताला हे करता आले नाही तर अंतिम फेरीत जाण्यासाठी इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आतापर्यंत दोनदा खेळला गेला आहे. २०२१ मध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या फायनलमध्ये टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध ८ विकेट्सने निराशाजनक पराभव स्वीकारावा लागला होता. तर २०२३ मध्ये भारताने पुन्हा एकदा अंतिम फेरी गाठली होती.
पण तिथे त्यांचा सामना ऑस्ट्रेलियाशी झाला. ओव्हल मैदानावर झालेल्या या सामन्यात कांगारू संघाने सुरुवातीपासूनच आपले वर्चस्व कायम राखले आणि २०९ धावांनी मोठा विजय नोंदवला. आतापर्यंत दोन फायनल खेळणारा भारत हा पहिला देश आहे.
संबंधित बातम्या