भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियावर पैशांचा वर्षाव केला होता. त्यांनी टीम इंडियासाठी १२५ कोटी रुपयांची घोषणा केली. पण खेळाडू, प्रशिक्षक आणि निवडकर्त्यांमध्ये पैशांचे वाटप कसे केले जाईल हे त्यांनी सांगितले नव्हते. संघात समाविष्ट असलेल्या १५ खेळाडूंना प्रत्येकी ५ कोटी रुपये मिळतील. विशेष म्हणजे, संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल आणि युजवेंद्र चहल या तीन खेळाडूंनी एकही सामना खेळला नाही.
बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, “खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला बीसीसीआयकडून मिळणाऱ्या बक्षिसाच्या रकमेबद्दल माहिती देण्यात आली आहे आणि आम्ही प्रत्येकाला इनव्हॉइस जमा करण्यास सांगितले आहे.
इनसाइडस्पोर्ट्सच्या एका रिपोर्टनुसार, भारतीय संघातील मुख्य १५ खेळाडूंना प्रत्येकी ५ कोटी रुपये दिले जातील, यामध्ये एकही सामना न खेळलेल्या खेळाडूंचाही समावेश आहे.
याशिवाय मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडलाही ५ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. याशिवाय गोलंदाजी प्रशिक्षक, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक या कोचिंग स्टाफमधील मुख्य सदस्यांना प्रत्येकी २.५ कोटी रुपये मिळतील.
तर निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्यासह उर्वरित ४ निवडकर्त्यांना प्रत्येकी १ कोटी रुपये दिले जाणार आहेत. उर्वरित फिजिओथेरपिस्ट, थ्रोडाउन स्पेशलिस्ट, मालिश करणारे आणि स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग प्रशिक्षक या सर्वांना प्रत्येकी २ कोटी रुपये मिळतील.
संघासोबत असलेल्या ४ राखीव खेळाडूंना प्रत्येकी १ कोटी रुपये दिले जातील. राखीव खेळाडूंमध्ये रिंकू सिंग, शुभमन गिल, आवेश खान आणि खलील अहमद यांचा समावेश होता. या सर्वांशिवाय व्हिडिओ विश्लेषक आणि लॉजिस्टिक मॅनेजर यांनाही रक्कम देण्यात येणार आहेत. टी-20 वर्ल्ड कपसाठी खेळाडूंसह एकूण ४२ लोकांचा स्टाफ गेला होते.
बीसीसीआयशिवाय आयसीसीनेही विजेत्या टीम इंडियाला बक्षीस रक्कम दिली. आयसीसीने जेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाला सुमारे २० कोटी रुपयांची बक्षीस रक्कम दिली होती. आयसीसीने उपविजेत्या दक्षिण आफ्रिकेला सुमारे १० कोटी रुपयांची बक्षीस रक्कमही दिली. एवढेच नाही तर उपांत्य फेरीत पोहोचलेल्या इतर संघांनाही आयसीसीने बक्षीस रक्कम दिली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने एकूण ९३.८ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर केली होती.
संबंधित बातम्या