Ravichandran Ashwin Hindi Official Language : टीम इंडियाचा क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रकेटमधून निवृत्त झाला. पण आता आर अश्विन एका वेगळ्याच कारणासाठी प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. कारण एका महाविद्यालयीन कार्यक्रमात त्याने 'हिंदी भाषे'बाबत एक वादग्रस्त टिप्पणी केली आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संबोधित करताना अश्विनने, हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही, परंतु ती निश्चितपणे देशाची राजभाषा आहे, असे वक्तव्य केले आहे. एका कॉलेज कार्यक्रमात बोलताना अश्विनने हे वक्तव्य केले.
एका खासगी कॉलेजच्या कार्यक्रमात क्रिकेटपटू अश्विन प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होता. यावेळी बोलताना अश्विनने भाषण केले आणि त्यानंतर त्याने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरेही दिली. शेवटी अश्विनने येथे कुणला हिंदीत प्रश्न विचारायचा नाहीत का, असा प्रश्न विद्यार्थ्यांना विचारला, तेव्हा विद्यार्थ्यांमधून कोणतीच प्रतिक्रिया आली नाही.
यानंतर अश्विन म्हणाला, "मला विश्वास आहे की मी हे बोलायला पाहिजे. हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा नसून ती केवळ राजभाषा आहे."
भारतीय राज्यघटनेत हिंदीला राजभाषेचा दर्जा देण्यात आला आहे. ही आपली राष्ट्रभाषा नाही. १४ सप्टेंबर हा हिंदी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. कारण या दिवशी केंद्र सरकारने हिंदीला राजभाषेचा दर्जा दिला होता. २०११ च्या जनगणनेनुसार, भारतातील ४३.६३ टक्के लोकसंख्या हिंदी बोलतात.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या मध्यावर अश्विनने निवृत्ती जाहीर केली होती. तो शेवटचा ॲडलेड पिंक बॉल टेस्टमध्ये खेळताना दिसला होता. ब्रिस्बेन कसोटी पावसामुळे अनिर्णित राहिल्यानंतर अश्विनने पत्रकार परिषदेत अचानक निवृत्ती जाहीर करून क्रिकेट जगताला आश्चर्यचकित केले होते.
अश्विनने कसोटी कारकिर्दीत ४ शतकांसह गोलंदाजी अष्टपैलू म्हणून नाव कमावले आहे. त्याला २०१४ मध्ये अर्जुन पुरस्कार मिळाला आणि २०१२-१३ हंगामासाठी BCCI चा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ठरला. डिसेंबर २०१६ मध्ये त्याने ICC क्रिकेटर ऑफ द इयर आणि सोबतच ICC टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर २०१६ हा पुरस्कार देखील जिंकला होता.
अश्विनने त्याच्या कसोटी कारकीर्दीत १०६ सामन्यांमध्ये ५३७ विकेट्स घेतल्या. तसेच अश्विनने ११६ एकदिवसीय सामन्यांमध्ये १५६ फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर अनुभवी फिरकीपटूच्या नावावर ६५ टी 20 सामन्यांमध्ये ७२ विकेट्सची नोंद आहे.
संबंधित बातम्या