Australia vs India, St Lucia Weather : टी-20 विश्वचषक २०२४ मध्ये आज (२४ जून) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. ऑस्ट्रेलियासाठी हा सामना करा किंवा मरोचा आहे. मात्र, हा सामना सुरू होण्याआधी क्रिकेट चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.
वास्तविक, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना सेंट लुसिया येथे होणार असून कालपासून (रविवार) येथे पाऊस पडत आहे. सामना सुरू होण्याच्या ५ तास आधी झालेल्या मुसळधार पावसाचा व्हिडिओ समोर आला आहे.
रविवारपासून सेंट लुसिया येथून पावसाचे व्हिडिओ समोर येत आहेत आणि आता सामन्याच्या ५ तास आधी तिथे मुसळधार पाऊस पडत आहे, ते पाहता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना टॉसशिवाय रद्द होऊ शकतो. मात्र, हा सामना रद्द झाल्यास ऑस्ट्रेलियाच्या उपांत्य फेरीतील आशांना मोठा फटका बसणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला तर टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहोचेल. यानंतर बांगलादेशविरुद्ध अफगाणिस्तानचा पराभव व्हावा, अशी प्रार्थना ऑस्ट्रेलियाला करावी लागणार आहे. अफगाणिस्तानने बांगलादेशला पराभूत केल्यास ते उपांत्य फेरीत पोहोचतील.
टीम इंडियाने सुपर-८ मध्ये सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकले आहेत. भारताने अफगाणिस्तानविरुद्धचा पहिला सामना आणि बांगलादेशविरुद्धचा दुसरा सामना जिंकला होता, त्यानंतर उपांत्य फेरी गाठणे जवळपास निश्चित झाले आहे. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी १ गुण मिळेल. अशा स्थितीत भारतीय संघ ५ गुणांसह उपांत्य फेरीत प्रवेश करेल.