इंडियन प्रीमियर लीग २०२५ साठी BCCI मुख्यालयात सर्व संघ मालकांमध्ये एक बैठक झाली. या बैठकीत मेगा लिलावापूर्वी संघात रिटेन खेळाडूंचे नियम आणि खेळाडूंची संख्या यावर चर्चा होणार होती, मात्र चर्चा केवळ मेगा लिलावाची गरज आणि भविष्य यावरच केंद्रित राहिली. या बैठकीत काही संघांच्या मालकांमध्ये जोरदार वादावादी झाली.
बैठकीत अनेक संघमालक मेगा लिलावाच्या विरोधात होते. यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा शाहरुख खान आणि सनरायझर्स हैदराबादचा काव्या मारन हे आघाडीवर होते. विशेष म्हणजे हे दोन्ही संघ यंदाच्या आयपीएलच्या फायनलमध्ये होते आणि त्यांना त्यांचा संघ तसाच ठेवायचा आहे. त्यांच्या मते, संघांना ब्रँड तयार करण्यासाठी आणि चाहत्यांशी जोडण्यासाठी स्थिरता आवश्यक आहे.
बैठकीत उपस्थित असलेल्या बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख खान मेगा लिलावाच्या विरोधात जोरदार बोलला. यादरम्यान पंजाब किंग्जचे मालक नेस वाडिया आणि शाहरूख खान यांच्यात थोडीशी खडाजंगीही पाहायला मिळाली. पण बैठकीनंतर वाडिया यांनी शाहरुखसोबत वाद झाल्याचे नाकारले. ते म्हणाले, की 'मी शाहरुखला २५ वर्षांपासून ओळखतो आणि त्यांच्यात कोणतेही वैर नाही, प्रत्येकाला आपल्या संघाच्या फायद्याचे निर्णय घ्यायचे असतात".
या दरम्यान, शाहरुखला सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन यांचीही साथ मिळाली. काव्या मारन यांच्या मते, त्यांच्या टीमला दरवर्षी छोटे लिलाव हवे असतात, मोठे लिलाव नको. संघ तयार करण्यासाठी खूप वेळ लागतो आणि युवा खेळाडू चांगले होण्यासाठीही वेळ लागतो. त्यांनी अभिषेक शर्माचे उदाहरण दिले, ज्याला चांगली कामगिरी करण्यासाठी तीन वर्षे लागली".
दिल्ली कॅपिटल्सचे पार्थ जिंदाल हे अधिक खेळाडू ठेवण्याच्या विरोधात होते. ते म्हणाले की, मेगा लिलाव करायचा की नाही असा प्रश्न पडला. काही लोक म्हणाले की मोठा लिलाव अजिबात होऊ नये, फक्त एक छोटा लिलाव असावा, परंतु त्यांना हे मान्य नाही.
मेगा लिलावामुळे सर्व संघांना समान संधी मिळते आणि यामुळेच आयपीएल चांगली होते, असे त्यांचे मत आहे. ते पुढे म्हणाले की ही फक्त काही संघ मालकांची बाब आहे आणि इतर सर्वांना मेगा लिलाव हवा आहे".
जिंदाल यांनी इम्पॅक्ट प्लेअर रूल रद्द करण्याबाबतही सांगितले. ते म्हणाले की काही लोकांना हा नियम आवडतो कारण तो तरुण खेळाडूंना खेळण्याची संधी देतो, परंतु काही लोक हे भारतीय क्रिकेटसाठी वाईट मानतात कारण ते अष्टपैलू खेळाडूंचा विकास होऊ देत नाही.
या बैठकीत दिल्ली कॅपिटल्सचे किरण कुमार ग्रांधी, लखनौ सुपर जायंट्सचे संजीव गोयंका, चेन्नई सुपर किंग्जचे रुपा गुरुनाथ, राजस्थान रॉयल्सचे मनोज बदाले आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे प्रथमेश मिश्रा उपस्थित होते.
मुंबई इंडियन्सचे मालक अंबानी कुटुंब व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीत सामील झाले.
बीसीसीआयने नंतर एक निवेदन जारी केले की संघ मालकांनी खेळाडूंचे नियम आणि इतर व्यावसायिक बाबींवर त्यांचे मत व्यक्त केले. बीसीसीआय आता या सूचना आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलकडे पाठवेल आणि त्यानंतर खेळाडूंसाठी नियम बनवण्याचा निर्णय घेईल.
संबंधित बातम्या