Health Ministry on Tobbaco Ban : भारतात क्रिकेट सामन्यांदरम्यान टीव्हीपासून मैदानावरील होर्डिंग्जपर्यंत अनेक प्रकारच्या जाहिराती केल्या जातात. त्यातून बीसीसीआयला (BCCI) भरघोस उत्पन्न मिळतं. या आर्थिक उत्पन्नावर आता गदा येण्याची चिन्हं आहेत. क्रिकेट सामन्यांच्या दरम्यान दाखवल्या जाणाऱ्या तंबाखू आणि गुटख्याच्या जाहिराती बंद घालण्याचा विचार केंद्रीय आरोग्य मंत्रालय करत आहे. याबाबत आरोग्य मंत्रालय लवकरच बीसीसीआयशी चर्चा करण्याची शक्यता आहे.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या अभ्यासानुसार २०२३ मधील एकूण जाहिरातींपैकी ४१.३ टक्के स्मोकलेस तंबाखू (SLT) ब्रँडच्या जाहिराती या क्रिकेट विश्वचषकाच्या शेवटच्या १७ सामन्यांमध्ये प्रसारित करण्यात आल्या होत्या. ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये मे महिन्यात ही माहिती प्रसिद्ध झाली आहे.
बॉलिवूड सेलिब्रिटी आणि माजी क्रिकेटपटू धूम्ररहित तंबाखू उत्पादन निर्मात्यांद्वारे निर्मित 'इलायची' माऊथ फ्रेशनरचा प्रचार करतात. आरोग्य मंत्रालय या जाहिराती थांबवण्याच्या मन:स्थितीत आहे.
आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या शिवाय आयपीएल (IPL) सारख्या लोकप्रिय स्पर्धांचं जिथं आयोजन केलं जातं, त्या ठिकाणी धूम्ररहित तंबाखूजन्य उत्पादनांच्या जाहिराती मोठ्या प्रमाणावर केल्या जातात. त्यात पान मसाला आणि च्युइंग तंबाखूच्या मिश्रणाचाही समावेश असतो. तरुणांमध्ये क्रिकेटची प्रचंड क्रेझ आहे. या सगळ्याचा परिणाम कळत-नकळत तरुणांवर होत असतो.
आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी लवकरच बीसीसीआयशी या संदर्भात संपर्क साधू शकतात आणि त्यांना कोणत्याही स्वरूपात तंबाखूशी संबंधित जाहिराती दाखवणं थांबवण्याची विनंती करू शकतात, अशी माहिती आरोग्य मंत्रालयातील एका अधिकाऱ्यानं नाव न छापण्याच्या अटीवर आमची सहयोगी इंग्रजी न्यूज वेबसाइट ‘लाइव्हमिंट’ला दिली.
संबंधित बातम्या