India Vs Australia Test : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या १५० धावांत आटोपला आहे. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या आक्रमक माऱ्यासमोर भारताच्या एकाही फलंदाजाला टिकाव धरता आला नाही.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पर्थमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारताची सुरुवातच अडखळत झाली. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाज चाचपडताना दिसत होते.
भारतीय डावाची सुरुवात करण्यासाठी उतरलेला यशस्वी जयस्वाल खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर आलेल्या देवदत्त पडिक्कल यालाही खातं उघडता आलं नाही. भारताला तिसरा झटका जोश हेझलवूडनं विराट कोहलीला ५ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद करून दिला. लंचची घोषणा होण्यापूर्वी केएल राहुल स्टार्कच्या बॉलवर २६ धावांवर बाद झाला. हा निर्णय अर्थातच वादग्रस्त ठरला.
लंच ब्रेकनंतर मिचेल मार्शनं ध्रुव जुरेल (११) आणि वॉशिंग्टन सुंदर (४) यांचा बळी घेतला. त्याचबरोबर पॅट कमिन्सला पंतच्या रूपात मौल्यवान विकेट मिळाली. पंतनं एकतर्फी झुंज देत ३७ धावा केल्या. यानंतर हर्षित राणा ७ तर कर्णधार जसप्रीत बुमराहनं ८ धावा केल्या. भारताला अखेरचा धक्का नितीश राणाच्या रूपानं बसला. जोश हेजलवूड, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि मिचेल मार्श यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाकडून जोश हेजलवूडनं सर्वाधिक ४ बळी घेतले. यातील एका विकेटचं श्रेय नॅथन मॅकस्वीनी आणि मार्नस लाबुशेन यांना जातं, कारण त्यांनी स्लिपमध्ये खूपच सुंदर झेल टिपला. हा झेल इतका सुंदर होता की सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
भारतीय डावाच्या ४७ व्या षटकातील चौथा चेंडू हर्षित राणाच्या बॅटला चाटून गेला आणि स्लिपमध्ये नॅथन मॅकस्वीनीकडं गेला. नॅथन मॅकस्वीनीनं डावीकडं उडी मारून कॅच पकडण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या हाताला लागला आणि उडाला. तिथं असलेल्या मार्नस लाबुशेननं कमालीची चपळाई दाखवत चेंडू जमिनीवर पडण्यापूर्वी तो पकडला.