भारत आणि पंतप्रधान इलेव्हन यांच्यात ३० नोव्हेंबरपासून कॅनबेरा येथे दोन दिवसीय सराव सामना खेळवला जात आहे. मात्र, मुसळधार पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. आज दुसऱ्या दिवशी (१ डिसेंबर) टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
दुसऱ्या दिवशीही काहीसा पाऊस पडला, अशा परिस्थितीत भारतीय वेगवान गोलंदाजांनी ढगाळ स्थितीचा फायदा घेत शानदार गोलंदाजी केली. २२ वर्षांचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा याने सर्वाधिक प्रभावित केले.
दिल्लीचा युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणाने पर्थ कसोटीत छाप पाडल्यानंतर आता सराव सामन्यातही आग ओकणारी गोलंदाजी केली. राणाने दोन षटकांत ४ बळी घेतले. त्याने पहिल्याच षटकात (डावाचे २३वे षटक) जॅक क्लेटन आणि ऑलिव्हर डेव्हिस यांच्यावर अप्रतिम बोल्ड केले.
यानंतर, त्याच्या पुढच्याच षटकात (डावाचे २५ वे षटक) हर्षितने कर्णधार जॅक एडवर्ड्स आणि सॅम हॅम्परला बाद केले. राणाने अवघ्या ६ चेंडूत या ४ विकेट घेतल्या.
आता ६ डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये सुरू होणाऱ्या दिवस-रात्र कसोटीत वेगवान गोलंदाज राणा भारतासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.
याशिवाय मालिकेबद्दल बोलायचे झाले तर, पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीची पहिली कसोटी भारताने २९५ धावांनी जिंकली. आता टीम इंडियाला ॲडलेडमधील पिंक बॉल टेस्टमध्येही आपली छाप सोडायची आहे.
पंतप्रधान इलेव्हनची फलंदाजी भारतीय गोलंदाजांसमोर फ्लॉप ठरली. तो ४३.१ षटकात २४० धावांवर सर्वबाद झाला. हर्षित राणाशिवाय आकाश दीपने २ बळी घेतले. मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनाही प्रत्येकी १ बळी मिळाला. भारताला ४६ षटकात २४१ धावा करायच्या आहेत.
संबंधित बातम्या