Concussion Substitute Rule In Marathi : भारताचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात जखमी झाला. टीम इंडियाच्या फलंदाजीदरम्यान त्याच्या हेल्मेटला चेंडू लागला. यानंतर त्याने चक्कर आल्याची तक्रार केली. त्यानंतर भारतीय संघाने त्याच्या जागी हर्षित राणा याला कनकशन सब्स्टीट्युट म्हणून खेळवण्याचे ठरवले, ज्यासाठी परवानगी देखील घेण्यात आली.
टीम इंडियाचा हा डाव एक वरदानच ठरला. कारण हर्षितने सामन्यात ३ बळी घेतले आणि हेच भारताच्या विजयाचे प्रमुख कारण ठरले. सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांनी हर्षितला कनकशन पर्याय म्हणून परवानगी दिली होती.
पण इंग्लंडने त्यांच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. अनेक दिग्गजांच्या मते, ही 'लाईक फॉर लाईक' बदली नव्हती. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आणि टीम इंडियाने चिटींग केल्याचे आरोप होऊ लागले.
पण भारताचा निर्णय हा आयसीसीच्या नियमांनुसारच होता, टीम इंडियाने कोणत्याच प्रकारची चिटींग केली नाही. हे आपण येथे समजून घेणार आहोत.
MCC की क्रिकेटचे नियम बनवणारी संस्था आहे. यानुसार 'जर एखादा सारखा खेळाडू असेल तर मॅच रेफरी कनकशन सब्सटीट्यूटला मान्यता देऊ शकतो. पण त्या खेळाडूच्या समावेशामुळे त्याच्या संघाला सामन्यात फारसा फायदा होणार नाही हेदेखील पाहावे लागेल.
मॅच रेफरीचा निर्णय अंतिम असेल आणि कोणताही संघ त्याविरुद्ध अपील करू शकत नाही, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान या नियमात ‘लाईक टू लाईक प्लेयर’ या शब्दाचे स्पष्टीकरण दिलेले नाही. पण २०१९ मध्ये जेव्हा हा नियम पहिल्यांदा लागू करण्यात आला तेव्हा ICC CEO ज्योफ अल्लार्डिस यांनी मीडियाला सांगितले होते की 'लाइक टू लाईक प्लेयर' कोणाला म्हटले जाईल.
कनकशन सब्सटीट्यूट हा नियम सर्वप्रथम स्टीव्ह स्मिथ याच्यासाठी वापरण्यात आला होता. स्टीव्ह स्मिथच्या हेल्मेटला चेंडू लागल्यानंतर ऑस्ट्रेलियाने त्याच्या जागी मार्नस लॅबुशेन याला फलंदाजीला पाठवले होते.
त्यावेळी आयसीसीचे सीईओ म्हणाले होते की, जेव्हा जेव्हा खेळाडू बदलले जातात तेव्हा प्रत्येक वेळी परिस्थिती वेगळी असते. कोणत्या खेळाडूच्या जागी कोणत्या खेळाडूला मैदानात उतरवले जाते हा सामनाधिकारींचा निर्णय असेल.
एजबॅस्टन येथे झालेल्या मीडिया ब्रीफिंगमध्ये त्यांनी पत्रकारांना सांगितले होते की, 'उरलेल्या सामन्यात दुखापतग्रस्त खेळाडूची भूमिका काय आहे त्यानुसार खेळाडूला पसंती दिली जाईल.'
या दृष्टीकोनातून पाहिल्यास शिवम दुबे हा अष्टपैलू खेळाडू आहे. उरलेल्या सामन्यात त्याचे काम गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करणे हेच होते. हर्षित राणानेही तेच केले. म्हणजेच भारतीय संघाने त्याला आयसीसीच्या नियमानुसारच मैदानात उतरवले आणि मॅच रेफरीनेही हेच लक्षात घेऊन परवानगी दिली असावी.
संबंधित बातम्या