बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी पर्थ येथील ऑप्टस क्रिकेट स्टेडियमवर खेळली जात आहे. या कसोटीचा आज (२३ नोव्हेंबर) दुसरा दिवस असून पहिल्याच सत्रात ऑस्ट्रेलिया १०४ धावांवर ऑलआऊट झाले. भारताने पहिल्या डावात १५० धावा केल्या होत्या. अशा स्थितीत टीम इंडियाला ४६ धावांची आघाडी मिळाली आहे.
दरम्यान, आज दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क आणि भारताकडून पदार्पण करणारा हर्षित राणा यांच्यात पहिल्या सत्रात खडाजंगी पाहायला मिळाली. स्टार्क फलंदाजी करत असताना राणा धारदार गोलंदाजी करून स्टार्कची कसोटी घेत होता. अशा स्थितीत दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली.
खरंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हर्षित राणा मिचेल स्टार्कला चांगलाच त्रास देत होता. तो वेगवान गतीने स्टार्कला बाउन्सरही टाकत होता. हर्षित राणा स्टार्कला वारंवार बीट करत होता.
यावेळी हर्षितने स्टार्कला एक गुड लेन्थ बॉल टाकला, ज्यावर एज लागला पण चेंडू फिल्डरपर्यंत पोहोचला नाही. यावर हर्षित राणाने स्टार्ककडे काही क्षण रोखून पाहिले.
यानंतर जेव्हा राणा पुन्हा गोलंदाजी रनअपवरा जायला लागला, तेव्हा स्टार्क त्याला म्हणाला, 'हर्षित मी तुझ्यापेक्षा वेगाने गोलंदाजी करतो, आणि मी हे सगळं चांगलेच लक्षात ठेवतो'. हे प्रत्युत्तर ऐकताच हर्षित राणा त्याला पाहून हसायला लागला.
हर्षित राणा आणि मिचेल स्टार्क आयपीएल २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून एकत्र खेळत होते. हे दोन्ही गोलंदाज केकेआरच्या गोलंदाजीचे महत्त्वाचे भाग होते. एक वरिष्ठ गोलंदाज म्हणून स्टार्कने त्या काळात हर्षितला उत्तम मार्गदर्शन केले. आयपीएलच्या मागील हंगामात हर्षित राणाने १३ सामन्यात १९ विकेट घेतल्या होत्या. तर मिचेल स्टार्कने १४ सामन्यात १७ विकेट घेतल्या होत्या.