Harshit Rana vs Mayank Agarwal: कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात काल आयपीएल २०२४ चा तिसरा सामना खेळला गेला. या अटीतटीच्या सामन्यात कोलकात्याने हैदराबादचा ४ धावांनी पराभव केला. या सामन्यात कोलकात्याचा वेगवान गोलंदाज हर्षित राणाने उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली. हैदराबादला अखेरच्या षटकात १३ धावांची गरज असताना हर्षित राणाने कोलकात्याला विजय मिळवून दिला. परंतु, मयांक अग्रवालला बाद केल्यानंतर त्याच्याकडे पाहून फ्लाइंग किस देणे, हर्षीत राणाला महागात पडले आहे. बीसीसीआयने या घटनेची दखल घेत हर्षीत राणाला दंड ठोठावला आहे.
कोलकाता नाईट रायडर्सचा गोलंदाज हर्षित राणाला आयपीएल २०२४ मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात आयपीएल आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल त्याच्या मॅच फीच्या एकूण ६० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे, असे बीसीसीआयकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.
हर्षीत राणाने आयपीएलच्या आचारसंहितेच्या कलम २.५ अंतर्गत लेव्हल १ चे दोन गुन्हे केले आहेत. या दोन्ही गुन्ह्यांसाठी त्याला मॅच फीच्या १० टक्के आणि ५० टक्के दंड ठोठावण्यात आला. राणाने दोन्ही गुन्ह्यांची कबूली देत मॅच रेफरीची शिक्षा स्वीकारली. आचारसंहितेच्या लेव्हल १ च्या उल्लंघनासाठी मॅच रेफरीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो.
भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी मात्र या युवा भारतीय अनकॅप्ड वेगवान गोलंदाजावर नाराजी व्यक्त केली. "हर्षीत राणाने तसे करायला नको होते. त्याच्या गोलंदाजीवर षटकार मारल्यानंतर फलंदाजाने असे काही केले का? अशा कृत्यांशिवाय क्रिकेट खेळता येते. हे टेलिव्हिजनचे युग आहे. ते मला समजतं. आपल्या सहकाऱ्यांसोबत सेलिब्रेशन करा, पण विरोधी संघासोबत असे करणे चुकीचे आहे", असे गावस्कर म्हणाले.