Harris Shield Semifinals : शालेय क्रिकेटमधील सर्वाधिक लोकप्रिय आणि प्रतिष्ठेच्या हॅरिस शिल्ड आंतरशालेय स्पर्धेच्या उपांत्य फेरीत अंजुमन इस्लाम आणि मॉडर्नच्या इंग्लिश माध्यम शाळांनी थरारक विजयासह अंतिम फेरी गाठली. आता अंतिम सामना १६ ते १८ डिसेंबरला ब्रेबर्न स्टेडियमवर खेळला जाईल.
उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात अंजुमन इस्लामनं (Anjuman Islam) अल बरकतचं १४४ धावांचं जबरदस्त आव्हान २ विकेट राखून गाठलं तर मॉडर्न इंग्लिश शाळेनं (Modern English School) १०३ धावांचा पाठलाग करणार्या ज्ञानदीप सेवा मंडळाचा डाव ८० धावांतच गुंडाळला आणि २३ धावांच्या विजयासह अंतिम फेरीत धडक मारली.
हॅरिस शिल्डचे दोन्ही उपांत्य सामने चुरशीचे झाले. काल सामन्याच्या दुसर्या दिवशी जोरदार खेळ झाल्यामुळं सामना रंगतदार वळणावर पोहोचला होता. अल बरकत इंग्लिश शाळेनं काल अंजुमन इस्लाम इंग्लिश शाळेपुढं १४४ धावांचं जबरदस्त आव्हान ठेवलं होतं. कालच्या बिनबाद ६ वरून खेळ सुरू करणार्या अंजुमन इस्लामनं शाहिद खानच्या नाबाद ४३ धावांच्या खेळीच्या जोरावर विजयी लक्ष्य ४० व्या षटकांतच गाठलं आणि २ विकेट राखून जेतेपदाच्या लढतीत आपलं स्थान निश्चित केलं. सामन्यात ९० धावांत ८ विकेट टिपणारा प्रभात पांडे सामनावीर ठरला. त्यानं फलंदाजीतही चमक दाखवताना पहिल्या डावात ४३ धावा ठोकल्या होत्या.
दुसरा सामनाही कमालीचा रंगतदार झाला. मॉडर्नचे १०३ धावांचं आव्हान स्वीकारून दुसर्या दिवशी ८ बाद ७५ अशा नाजूक स्थितीत असलेल्या ज्ञानदीपचा संघ ८० धावांतच आटोपला. काल १९ धावांत ४ विकेट टिपणार्या दिक्षांत पाटीलनं आजचे उर्वरित दोन्ही विकेट ५ धावांतच गारद केले आणि मॉडर्नला अंतिम फेरीत नेण्यात सिंहाचा वाटा उचलला. सामनावीर ठरलेल्या दीक्षांतनं या सामन्यात ५२ धावांत १० विकेट गारद केले. दोन्ही सामन्यातील सामनावीरांना एसजी कंपनीच्या वतीनं ३ हजार रुपये किमतीचे व्हाऊचर इनाम रूपात देण्यात आले.
पहिला उपांत्य सामना
मॉडर्न इंग्लिश शाळा (प.डाव) : ३९.५ षटकांत सर्वबाद ११४; ज्ञानदीप सेवा मंडळ (प.डाव): ४० षटकांत सर्वबाद १२५
मॉडर्न (दु.डाव): ३५.३ षटकांत सर्वबाद ११४ (कणव सैनी ४१, झैद खान ६/३८, विराट यादव ३/५३); ज्ञानदीप (दु.डाव): ३५.५ षटकांत सर्वबाद ८० (दिक्षांत पाटील ६/२२, जसमीत सिंह २/२३, शशांक नाईक २/२१).
दुसरा उपांत्य सामना
अल बरकत इं. शाळा (प.डाव): ५८.२ षटकांत सर्वबाद २०२; अंजुमन इस्लाम इं. शाळा (प.डाव): ६०.३ षटकांत सर्वबाद १९१ (प्रभात पांडे ४३, अफझल शेख ३४, नितेश निशाद ४/५१, वली सय्यद ४/४०)
अल बरकत (दु.डाव): ३५.१ षटकांत सर्वबाद १३२ (आकाश मांगडे ४७, वेदांत बने ३५, प्रभात पांडे ५/३४, शेन रझा ३/४६); अंजुमन इस्लाम (दु.डाव): ३९.४ षटकांत ८ बाद १४४ (शाहिद खान ना. ४३, अरहान पटेल ३१; देवेन यादव ३/४७).
संबंधित बातम्या