पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. पाकिस्तान संघाने या मालिकेतील पहिला सामना जिंकला आहे. बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तान संघाने ५७ धावांनी विजय मिळवला.
पाकिस्तानच्या विजयात एका खेळाडूने महत्त्वाची भूमिका बजावली आणि यादरम्यान या खेळाडूने पाकिस्तानसाठी एक मोठा विक्रमही केला. हा खेळाडू दुसरा कोणी नसून पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हरिस रौफ आहे.
झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजाने २ विकेट घेतल्या. या सामन्यात पहिली विकेट घेत त्याने एक मोठा टप्पा गाठला आहे. तो आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये पाकिस्तानकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. हारिस रौफने रायन बर्लची विकेट काढून ही कामगिरी केली आहे.
या वेगवान गोलंदाजाने १५व्या षटकात ब्लेसिंग मुझाराबानीलाही बाद केले. यासह आता त्याच्या नावावर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण १०९ विकेट्स आहेत.
रौफने केवळ ७६ टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये हे यश मिळवले आहे. त्याने शादाब खानला मागे सोडले. शादाबने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये एकूण १०७ विकेट घेतल्या आहेत.
हरिस रौफ: ७६ सामन्यात १०९ विकेट
शादाब खान: १०४ सामन्यात १०७ विकेट
शाहीन आफ्रिदी : ७३ सामन्यात 97 बळी
शाहिद आफ्रिदी: ९८ सामन्यात ९७ विकेट
उमर गुल : ६० सामन्यात ८५ बळी
दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. उस्मान खान, तय्यब ताहिर आणि इरफान खान यांच्या दमदार योगदानामुळे पाकिस्तानने निर्धारित २० षटकात १६५ धावा केल्या.
यानंतर १६६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ १५.३ षटकात १०८ धावांवर सर्वबाद झाला. या विजयासह पाकिस्तानने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील पुढील सामना ३ डिसेंबर रोजी त्याच मैदानावर होणार आहे.
संबंधित बातम्या