देशांतर्गत वनडे क्रिकेट स्पर्धा विजय हजारे ट्रॉफीचा थरार शनिवार (२१ डिसेंबर) पासून सुरू होणार आहे. पण या स्पर्धेच्या एक दिवस आधी मोठी माहिती समोर आली आहे. टीम इंडियाचा विकेटकीपर तसेच, स्फोटक फलंदाज संजू आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या या स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळणार नाहीत.
अशा प्रकारे बडोदा आणि केरळ संघ आपल्या स्टार खेळाडूंशिवाय मैदानात उतरणार आहेत. अलीकडेच संजू आणि हार्दिक पंड्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळताना दिसले होते.
या स्पर्धेत दोन्ही खेळाडूंनी आपली ताकद दाखवली होती, मात्र आता दोघेही विजय हजारे ट्रॉफीच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळणार नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हार्दिक पंड्या वैयक्तिक कारणांमुळे विजय हजारे ट्रॉफीच्या सुरुवातीच्या सामन्यांचा भाग असणार नाही. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. हार्दिक पांड्या विजय हजारे ट्रॉफीच्या सुरुवातीच्या सामन्यांनंतर खेळणार आहे, कारण त्याला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी आपली तयारी करायची आहे.
संजू सॅमसनला केरळ संघातून वगळण्यात आले आहे. विजय हजारे ट्रॉफीसाठी जाहीर करण्यात आलेल्या केरळ संघात संजू सॅमसनचे नाव नाही. आणि यामागे कोणतेही वैयक्तिक कारण नाही. या स्पर्धेपूर्वी संजूने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये केरळचे नेतृत्व केले होते.
खरे तर केरळ क्रिकेट असोसिएशनने संजूवर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. या स्पर्धेसाठी आयोजित केलेल्या शिबिरात संजू सहभागी झाला नव्हता. यासाठीच त्याला शिक्षा झाली आहे.
याबाबत माहिती देताना केसीएचे सचिव विनोद कुमार यांनी एका वृत्तपत्राला सांगितले. की, ‘संजूने एक ईमेल पाठवला असून त्यात तो शिबिरासाठी उपलब्ध नसल्याचं लिहिलं होतं. संघाने त्याच्याशिवाय वायनाडमध्ये एक छोटेसे शिबिर घेतले. साहजिकच आम्ही निवडीसाठी त्या सत्रात उपलब्ध असलेल्या खेळाडूंचाच विचार केला. या विषयावर त्याच्याशी पुढे कोणतीही चर्चा झाली नाही'.