Hardik Pandya Rohit Sharma : भारतीय वनडे आणि कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मा याचा वाईट काळ काही संपत नाहीये. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत, त्यानंतर रणजी ट्रॉफी आणि आता इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत तो अपयशी ठरला आहे. नागपूर वनडेत केवळ २ धावा करून रोहित बाद झाला.
आता चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताला चांगली कामगिरी करता आली नाही, तर रोहितकडून कर्णधारपद हिसकावून हार्दिक पांड्याकडे सोपवले जाऊ शकते, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार, रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करू शकली नाही, तर हार्दिक नवा कर्णधार होऊ शकतो. पुढे असेही म्हटले आहे, की मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना हार्दिक पांड्या याला उपकर्णधार बनवायचे होते, परंतु रोहित शर्मा आणि अजित आगरकर यांनी शुभमन गिलला उपकर्णधार बनवले.
दरम्यान, असेही सांगण्यात आले की, सूर्यकुमार यादव याचा फॉर्म पाहता टी-20 संघाची कमानही हार्दिककडे सोपवली जाण्याची शक्यता आहे.
बीसीसीआय आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यातील अनेकांचे मत आहे की हार्दिकवर अन्याय झाला आहे. फिटनेसशी संबंधित समस्यांमुळे त्याला कर्णधारपद गमवावे लागले होते, परंतु त्याचा वैयक्तिक फॉर्म उत्कृष्ट राहिला आहे.
दुसरीकडे, सूर्यकुमार यादवबद्दल याच्याबाबत बोलायचे झाले, तर तो इंग्लंडविरुद्धच्या ५ टी-20 डावांमध्ये केवळ २८ धावा करू शकला. अशा परिस्थितीत सूर्याकडून कर्णधारपद काढून हार्दिककडे सोपवले जाऊ शकते, अशी अटकळ बांधली जात आहे.
दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने पाहुण्या संघाचा ४ गडी राखून पराभव केला आहे. आता दुसरा सामना ९ फेब्रुवारीला कटकमध्ये आणि तिसरा सामना १२ फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये होणार आहे.
संबंधित बातम्या