भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या जवळपास ६ वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतो. हार्दिक पांड्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये दिसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हार्दिक पंड्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळणार आहे.
यानंतर तो आपल्या राज्यासाठी रणजी ट्रॉफीही खेळण्याची शक्यता आहे. अशाप्रकारे लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यानंतर तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये खेळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये हार्दिक पंड्या बडोद्याकडून खेळणार असल्याचे मानले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या भारतीय अष्टपैलू खेळाडूने बडोदा क्रिकेट असोसिएशनकडे आपली इच्छा व्यक्त केली आहे. तसेच, हार्दिक पांड्याला रणजी ट्रॉफीमध्येही खेळायचे आहे.
रणजी ट्रॉफीत जर चांगली कामगिरी केली तर हार्दिकचे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये खेळण्याचे चान्सेस वाढतील. दरम्यान सध्या दुलीप ट्रॉफी खेळली जात आहे, पण हार्दिक पांड्या या स्पर्धेचा भाग नाही.
हार्दिक पांड्या भारताकडून अखेरचा टी-20 सामना जुलैमध्ये खेळला होता. त्याचवेळी हार्दिक पांड्या गेल्या ६ वर्षांपासून कसोटी क्रिकेटपासून दूर आहे. खरंतर, फिटनेसशी संबंधित समस्यांमुळे हार्दिक पांड्या रेड बॉल क्रिकेटमध्ये कमी दिसतो. हार्दिक पांड्या भारताकडून अखेरचा कसोटी सामना २०१८ मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता.
भारताकडून खेळलेल्या ११ कसोटींमध्ये त्याच्या नावावर १७ विकेट आणि ५३२ धावा आहेत. हार्दिक २०१८ पासून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दिसलेला नाही. डिसेंबर २०१८ मध्ये, तो मुंबईविरुद्ध रणजी सामना खेळला. मात्र, आता हार्दिक पांड्या रेड बॉल क्रिकेटमध्ये केव्हा पुनरागमन करतो हे पाहणे रंजक ठरेल.