आयपीएलमधील अपयशानं खचला नाही, टी-२० विश्वचषकात करून दाखवलं; हार्दिक पांड्यानं गाठला मैलाचा दगड!
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  आयपीएलमधील अपयशानं खचला नाही, टी-२० विश्वचषकात करून दाखवलं; हार्दिक पांड्यानं गाठला मैलाचा दगड!

आयपीएलमधील अपयशानं खचला नाही, टी-२० विश्वचषकात करून दाखवलं; हार्दिक पांड्यानं गाठला मैलाचा दगड!

Jul 03, 2024 04:11 PM IST

Hardik Pandya: आयसीसी नुकतीच आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटची क्रमवारी जाहीर केली. यात हार्दिक पांड्याने मोठी झेप घेऊन आपली क्षमता दाखवून दिली.

हार्दिक पांड्याने टी-२० विश्वचषकात दमदार कामगिरी केली.
हार्दिक पांड्याने टी-२० विश्वचषकात दमदार कामगिरी केली. (ICC- X)

T20I All-Rounder Ranking: भारताने टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने आपल्या कारकिर्दीतील आणखी एक मैलाचा दगड गाठला असून तो जगातील पहिल्या क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू ठरला आहे. टी-२० विश्वषकात हार्दिक पांड्याने १४४ धावा आणि ११ विकेट घेऊन स्पर्धेची सांगता केली. हार्दिक आंतराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये अव्वल स्थान गाठणारा पहिला भारतीय अष्टपैलू खेळाडू ठरला.

टी-२० विश्वचषकातील कामगिरीच्या जोरावर हार्दिकने वानिंदू हसरंगाला दुसऱ्या स्थानावर ढकलले. टी-२० विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी हार्दिक पांड्या ऑऊट ऑफ फॉर्म होता. आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वाखाली मुंबई इंडियन्सच्या संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरला. यामुळे हार्दिक पांड्याला खूप ट्रोल करण्यात आले.

परंतु, टी-२० विश्वचषकात त्याने आपली क्षमता दाखवून देत टीकाकऱ्यांच्या तोंडाला कुलूप लावले. टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात हार्दिक पांड्याने महत्त्वाची भूमिका बजावली. अखरेच्या षटकात १६ धावांचा बचाव करण्यासाठी आलेल्या हार्दिक पांड्याने सूर्यकुमार यादवच्या शानदार झेलच्या जोरावर मिलरला पहिल्याच चेंडूवर बाद केले. उर्वरित षटकात भेदक गोलंदाजी करत भारताला विश्वचषक जिंकून दिला. यानंतर हार्दिक पांड्याला मैदानातच अश्रू अनावर झाले.

हार्दिक पांड्याची दमदार कामगिरी

अंतिम फेरीत योगदान देण्याबरोबरच हार्दिकने संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली. पाकिस्तानविरुद्ध हार्दिकने फखर झमान आणि शादाब खान यांना बाद करत २४ धावांत २ विकेट घेतले, तर अमेरिकेविरुद्ध १४ धावांत २ विकेट घेतले. हार्दिकने बांगलादेशविरुद्ध नाबाद अर्धशतक झळकावले आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध नाबाद २३ आणि इंग्लंडविरुद्ध २३ धावा केल्या.

बुमराह- कुलदीपची भेदक गोलंदाजी

गोलंदाजांमध्ये १५ विकेट्स साठी प्लेअर ऑफ द टूर्नामेंट ठरलेला जसप्रीत बुमराहने टी-२० क्रिकेटमध्ये १२ स्थानांची झेप घेतली असून तो सध्या ११ व्या स्थानावर पोहोचला आहे. या संपूर्ण स्पर्धेत जसप्रीत बुमराहने उल्लेखनीय कामगिरी बजावली. बुमराहने पाकिस्तानविरुद्ध १४ धावांत ३ विकेट बाद करत शानदार सुरुवात केली आणि अमेरिकेविरुद्धचा विकेटविरहित सामना वगळता त्याने आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर फलंदाजांना चकवा दिला. फायनलमध्ये त्याने रीझा हेंड्रिक्सला बाद करत मार्को जेन्सनचे स्टंप तोडून भारताच्या विजयाचा पाया रचला. कुलदीप यादव आंतरराष्ट्रीय टी-२० क्रमवारीत आठव्या क्रमांकावर आहे. त्याने टी-२० विश्वचषकात भारतासाठी १० विकेट्स घेतल्या.

अर्शदीप चमकदार खेळी

अंतिम फेरीतील भारताचा आणखी एक हिरो अर्शदीप सिंहने १३वे स्थान पटकावले. वेस्ट इंडिज लेगमध्ये पदार्पण केल्यापासून कुलदीप हा भारताचा सर्वोत्कृष्ट फिरकीपटू होता. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २४ धावांत दोन विकेट घेत कर्णधार मिचेल मार्शला बाद केले आणि उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध १९ धावांत ३ विकेट घेतले.

Whats_app_banner
विभाग