टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पंड्या याने ग्वाल्हेरमध्ये बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात अप्रतिम खेळी केली. भारतीय फलंदाजांच्या शानदार कामगिरीमुळे टीम इंडियाने अवघ्या ११.५ षटकांत एकतर्फी विजय मिळवला.
भारतीय अष्टपैलू खेळाडू हार्दिकने बांगलादेशविरुद्धचा सामना षटकार ठोकून संपवला. षटकार मारून त्याने विराट कोहलीचा एक विक्रम मोडला आहे.
रविवारी (६ ऑक्टोबर) न्यू माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात हार्दिकने १६ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने टीम इंडियासाठी ३९* धावा केल्या.
हार्दिक सर्वाधिकवेळा षटकार मारून सामना संपवणारा फलंदाज
यादरम्यान त्याने षटकार मारून टीम इंडियाला विजय मिळवून दिला. यासह आता हार्दिक पंड्या असा खेळाडू बनला आहे, ज्याने टी-20 इंटरनॅशनलमध्ये सर्वाधिक वेळा षटकार मारून भारताला विजय मिळवून दिला आहे.
हार्दिकने ५ वेळा षटकार मारून टीम इंडियाला टी-20 इंटरनॅशनलमध्ये विजय मिळवून दिला आहे. तर विराट कोहलीने हे ४ वेळा केले आहे. अशा प्रकारे हार्दिकने किंग कोहलीचा महान विक्रम मोडला. या यादीत माजी कर्णधार एमएस धोनी आणि सध्याचा फलंदाज ऋषभ पंत यांचाही समावेश आहे.
दोन्ही फलंदाजांनी ३-३ वेळा षटकार मारून भारताचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना संपवला.
ग्वाल्हेरमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 मध्ये टीम इंडियाने सहज विजय मिळवला. या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशचा डाव १९.५ षटकात १२७ धावांवर गुंडाळला.
यादरम्यान टीम इंडियाकडून अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी ३ बळी घेतले. याशिवाय हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर आणि मयंक यादव यांना प्रत्येकी १ विकेट मिळाला.
त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने ११.५ षटकांत ३ बाद १३२ धावा करून विजय मिळवला. टीम इंडियाला सलामीवीर संजू सॅमसन याने चांगली सरुवात करून दिली. यादरम्यान, शेवटी हार्दिक पांड्याने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली आणि १६ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३९* धावा केल्या.