
टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्या आज (११ ऑक्टोबर) त्याचा ३१वा वाढदिवस साजरा करत आहेत. हार्दिक पंड्या याचा जन्म आजच्या दिवशी १९९३ साली गुजरातमधील सुरत येथे झाला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३,८०० हून अधिक धावा करण्यासोबतच हार्दिकने १८८ विकेट्सही घेतल्या आहेत. हार्दिक BCCI चा ग्रेड A चा खेळाडू असून त्याला वार्षिक ५ कोटी पगार मिळतो.
याशिवाय प्रायोजकत्व, आयपीएल आणि इतर अनेक स्रोतांमधूनही तो भरपूर कमाई करतो. पण त्यांची आर्थिक परिस्थिती नेहमीच अशी नव्हती कारण त्यांच्या कुटुंबाला खूप संघर्ष करावा लागला.
एक काळ असा होता, जेव्हा हार्दिक पंड्याचे वडील हिमांशू पंड्या यांचा सुरतमधील कारचा व्यवसाय डळमळीत सुरू होता. आर्थिक संकटामुळे ते कुटुंबासह सुरतहून वडोदरा येथे स्थलांतरित झाले. त्यांच्या नवीन शहरात येण्याचे एक कारण म्हणजे त्यांची मुले हार्दिक आणि कृणाल पंड्या यांचे क्रिकेट प्रशिक्षण हेदेखील होते.
सुरुवातीला त्यांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नव्हती. हार्दिक आणि त्याचा भाऊ कृणाल पांड्याकडे क्रिकेट किट खरेदी करण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळेच ते दोघे स्थानिक स्पर्धांमध्ये २०० रुपये घेऊन खेळायचे.
हार्दिकने स्वत: एका मुलाखतीत सांगितले होतेकी, आर्थिक परिस्थिती खराब असल्याने त्यांनी असेही दिवस पाहिले की जेव्हा त्यांना नाश्ता आणि रात्रीच्या जेवणासाठी फक्त मॅगी खावी लागायची आणि जे पैसे वाचले त्यातून ते क्रिकेट किट खरेदी करायचे.
या कठीण काळानंतर अखेर २०१५ मध्ये तो ऐतिहासिक दिवस आला जेव्हा IPL संघ मुंबई इंडियन्सने त्याला विकत घेतले. मुंबईत दाखल झाल्यानंतर हार्दिकने भारतीय संघात प्रवेश केला. २०१६ मध्ये, त्याने भारतासाठी पहिला सामना खेळला. यानंतर हार्दिकने भारतीय संघातील वेगवान गोलंदाज ऑलराऊंडरची उणीव भरून काढली.
हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती आता ९४ कोटी रुपये इतकी आहे. हार्दिक पांड्याला महागडी घड्याळे घालण्याची खूप आवड असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. त्याच्या घड्याळांची किंमतही करोडोंच्या घरात आहे. त्याच्याकडे आलिशान कार देखील आहेत, त्यामध्ये ६ कोटींहून अधिक किमतीच्या रोल्स रॉयसचा समावेश आहे.
त्याच्याकडे लॅम्बोर्गिनी ह्युरेकन आणि रेंज रोव्हर वोग सारख्या टॉप क्लास कार आहेत, ज्यांची किंमत ३.५ कोटी आणि ४ कोटी रुपये आहे. ही आलिशान जीवनशैली हा हार्दिकच्या मेहनतीला फळ मिळाल्याचा पुरावा आहे.
संबंधित बातम्या
