गेल्या महिन्यात टी-20 विश्वचषकादरम्यान पाकिस्तानचा माजी क्रिकेटर कामरान अकमल याने एका टीव्ही कार्यक्रमात शीख समुदायावर वादग्रस्त टिप्पणी केली होती. वास्तविक, कामरानने भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगची त्याच्या धर्मावरून खिल्ली उडवली होती. यानंतर मोठा गदारोळ झाला. भारताचा माजी खेळाूडू हरभजन सिंगने सोशल मीडियाच्या माध्यमातून कामरान अकमलवर जोरदार टीका केली होती.
आता या संपूर्ण प्रकरणाच्या एक महिन्यानंतर आपापल्या संघाचे दोन्ही दिग्गज आमनेसामने आले आहेत. हरभजन सिंग आणि कामरान अकमल यांची बर्मिंगहॅम येथे 'वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स' (WCL) स्पर्धेत भेट झाली. यावेळी भज्जी अकमलला काही तर बोलताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोघांमध्ये जोरदार चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
व्हिडिओमध्ये पाकिस्तानी खेळाडू भज्जीला काहीतरी समजावण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. पण हरभजन सिंग खूपच आक्रमक दिसत आहे. मात्र, दोघांमध्ये काय संभाषण सुरू आहे, हे समोर आलेले नाही.
वास्तविक, टी-20 वर्ल्ड कप २०२४ च्या ग्रुप स्टेजमध्ये भारताने पाकिस्तानचा ६ धावांनी पराभव केल्यावर संपूर्ण वाद निर्माण झाला होता. पराभवानंतर पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर पडला. त्या सामन्यात अर्शदीप सिंगने शानदार गोलंदाजी होती. यानंतर कामरान अकमलने एका कार्यक्रमात अर्धशदीपची खिल्ली उडवताना संपूर्ण शीख धर्माची खिल्ली उडवली.
तेव्हा हरभजन संतापून म्हणाला होता, 'कामरान अकमलने हे समजून घेतले पाहिजे की, कोणाच्याही धर्माबद्दल काहीही बोलण्याची आणि त्याची खिल्ली उडवण्याची गरज नाही.
मला कामरान अकमलला विचारायचे आहे की त्याला शिखांचा इतिहास माहित आहे का, शीख कोण आहेत आणि त्यांचा इतिहास काय आहे. तुमच्या समाजाला, तुमच्या माता-भगिनींना वाचवण्यासाठी शिखांनी जे काही काम केले आहे. हे तुमच्या पूर्वजांना विचारा, शीख लोक रात्री १२ वाजता मुघलांवर हल्ला करायचे आणि तुमच्या माता-भगिनींची रक्षा करायचे, त्यामुळे फालतू बोलणे बंद करा".
कामरान अकमलने नंतर त्याच्या शब्दांबद्दल माफी मागितली, तो म्हणाला होता, की 'मला माझ्या अलीकडील टिप्पण्यांबद्दल मनापासून खेद आहे आणि मी भज्जीची मनापासून माफी मागतो. माझे शब्द अयोग्य आणि शीख समुदायाचा अपमान करणारे होते. मला जगभरातील शीख लोकांबद्दल अत्यंत आदर आहे आणि कोणालाही दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. मला खरच माफ करा".
संबंधित बातम्या