harbhajan singh comment on anushka and athiya : क्रिकेट वर्ल्डकपचा अंतिम सामना रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. यावेळी भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नी आणि कुटुंबातील सदस्यही स्टेडियममध्ये उपस्थित होते.
या सामन्यादरम्यान माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग कॉमेंट्री करत होता. यादरम्यान त्याने भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा आणि केएल राहुलची पत्नी अथिया शेट्टी यांच्याबद्दल एक टिप्पणी केली, आता ही टिप्पणी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
हिंदी कॉमेंट्रीमध्ये हरभजन म्हणाला की, यांच्यात मॅचबद्दल चर्चा सुरूय की चित्रपटांबद्दल?
सामन्याच्या पहिल्या डावात विराट आणि केएल राहुल फलंदाजी करत असताना अनुष्का आणि अथिया स्टेडियममध्ये एकत्र बसून त्यांना चिअर करत होत्या.
या दरम्यान, जेव्हा कॅमेरा दोन्ही अभिनेत्रींवर गेला, तेव्हा हरभजन म्हणाला, 'मला प्रश्न पडत आहे की या दोघी (अनुष्का आणि अथिया) क्रिकेटबद्दल बोलत आहेत की चित्रपटांबद्दल. कारण क्रिकेटबद्दल त्यांना एवढी समज असेल हे मला वाटत नाही.
हरभजनच्या या कमेंटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर प्रतिक्रिया देत अनेक यूजर्सनी त्याला ट्रोल केले आहे. एका युजरने लिहिले की, अशा प्रकारची कमेंट योग्य नाही.
आणखी एका यूजरने लिहिले की, ‘महिलांना क्रिकेट समजते की नाही याचा अर्थ काय? लगेच माफी माग..’
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या या विश्वचषकाच्या अंतिम सामन्याला अनेक सेलिब्रिटींनी हजरी लावली होती. सामन्यादरम्यान दीपिका-रणवीर, आयुष्मान खुराना, शनाया कपूर, आशा भोसले आणि शाहरुख खान यांनी आपल्या कुटुंबासह टीमला चिअर केले.