भारताचा टी-20 क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आज शनिवारी (१४ सप्टेंबर) त्याचा ३४ वा वाढदिवस साजरा करत आहे. टीम इंडियात उशिराने पदार्पण करणाऱ्या सूर्याने अल्पावधीतच आपला दबदबा निर्माण केला आहे. त्याने २०२१ मध्ये वयाच्या ३१ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
स्काय, सूर्या भाऊ, सूर्यादादा, मिस्टर ३६० अशा नावांनी प्रसिद्ध असलेल्या यादवने इंडियन प्रीमियर लीगमध्ये चमकदार कामगिरी केली. यानंतर त्याला टीम इंडियाकडून बोलावण्यात आले. भारतीय संघात प्रवेश केल्यानंतर त्याने निश्चितच आपले स्थान पक्के केले आहे.
उत्तर प्रदेशातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या सूर्यकुमार यादव याचा प्रवास एखाद्या सोनेरी स्वप्नापेक्षा कमी नाही.
सूर्यकुमार यादव याचे काका विनोद यादव हे त्याचे पहिले क्रिकेट प्रशिक्षक होते. जेव्हा सूर्या १० वर्षांचा होता, तेव्हा त्याचे कुटुंब वाराणसीहून मुंबईत आले आणि त्याच वर्षी त्याने आपल्या शाळेच्या संघासाठी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. सूर्याने दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमी'मधून क्रिकेट ट्रेनिंग घेतली.
त्याने २०१० मध्ये प्रथम श्रेणी हंगामात मुंबईकडून खेळताना त्याने दिल्लीविरुद्ध ८९ चेंडूत ७३ धावा केल्या होत्या. यानंतर तो चर्चेत आला.
यानंतर २०१२ च्या आयपीएल हंगामात सूर्याला पहिल्यांदा मुंबई इंडियन्सने खरेदी केले होते, परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा आणि किरॉन पोलार्ड सारख्या दिग्गजांना प्रभावित करण्यात तो अपयशी ठरला.
पण, वेगवान गोलंदाजांविरुद्ध डीप स्क्वेअर लेगवर षटकार मारण्याच्या अप्रतिम क्षमतेसाठी आणि त्याची सिग्नेचर शॉट स्वीप शॉटसाठी प्रसिद्ध असलेल्या सूर्याचे टॅलेंट कोलकाता नाइट रायडर्सचा तत्कालीन कर्णधार गौतम गंभीरने हेरले.
गंभीरने सूर्याला संघात घेतले, तो केकेआरचा उपकर्णधारही होता, पण नंतर मुंबई इंडियन्सने त्याचा पुन्हा आपल्या संघात समावेश केला. आज तो संघाचा प्राण आहे.
टी-20 क्रमवारीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. पण तो वनडेत आतापर्यंत प्रभावी कामगिरी करू शकला नाही. सूर्यकुमार यादवने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत ३७ एकदिवसीय सामने खेळले आहेत. या काळात त्याने ३५ डावात २५.७६ च्या सरासरीने आणि १०५.०२ च्या स्ट्राईक रेटने ७७३ धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने ४ अर्धशतके झळकावली आहेत.
या फॉरमॅटमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद ७२ आहे. स्कायने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत फक्त १ कसोटी सामना खेळला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात त्याने केवळ ८ धावा केल्या होत्या.