Virat Kohli Birthday: 'रनमशीन' विराट कोहली झाला ३६ वर्षांचा, जाणून घ्या त्याचे 'हे' खास विक्रम
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Virat Kohli Birthday: 'रनमशीन' विराट कोहली झाला ३६ वर्षांचा, जाणून घ्या त्याचे 'हे' खास विक्रम

Virat Kohli Birthday: 'रनमशीन' विराट कोहली झाला ३६ वर्षांचा, जाणून घ्या त्याचे 'हे' खास विक्रम

Nov 05, 2024 10:20 AM IST

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली आज ३६ वर्षांचा झाला आहे. दरम्यान, २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या कोहलीने अनेक खास विक्रमाला गवसणी घातली आहे.

'रनमशीन' विराट कोहली झाला ३६ वर्षांचा
'रनमशीन' विराट कोहली झाला ३६ वर्षांचा

Happy Birthday Virat Kohli: भारताचा महान क्रिकेटपटू विराट कोहली आज (०५ नोव्हेंबर २०२४) ३६ वर्षांचा झाला. दरम्यान, २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या विराट कोहलीने आपल्या १५ वर्षाच्या कारकिर्दीत अनेक मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.  यामुळे त्याला सर्वकालीन महान क्रिकेटपटूंच्या यादीत स्थान मिळाले आहे. त्याचे प्रभावी विक्रम आणि असंख्य पुरस्कार हे त्यांच्या कठोर परिश्रमाची साक्ष देतात. 

आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून विराट कोहलीने ११८ सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे आणि ४७.८३ च्या सरासरीने ९ हजार ४० धावा केल्या आहेत, ज्यात २९ शतके आणि ३१ अर्धशतके आहेत. त्याची कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम धावसंख्या २५४*  आहे. सर्वोत्तम धावसंख्या आहे. भारताकडून कसोटीत सर्वाधिक धावा करणारा आणि शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर आहे. 

विराटच्या कसोटी कारकिर्दीत अनेक चढ-उतार आले आहेत. २०१६ ते २०१९ या कालावधीत त्याने ४३ कसोटी आणि ६९ डावांमध्ये ८८.७९ च्या सरासरीने ४ हजार २०८ धावा केल्या आहेत, ज्यात १६ शतके आणि १० अर्धशतकांचा समावेश आहे. याच काळात त्याने सात द्विशतके झळकावली, जो एक विक्रम होता कर्णधार म्हणून सर्वाधिक द्विशतके झळकणारा फलंदाजाच्या यादीत विराट कोहली अव्वल स्थानी आहे.

भारताचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार

विराट कोहली भारताचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे, त्याने भारताला ६८ कसोटी सामन्यांमध्ये ४० विजय मिळवून दिले आहेत. तर, फक्त १७ सामने गमावले आणि ११ ड्रॉ केले आहेत. त्याच्या विजयाची टक्केवारी ५८ च्या वर आहे.

एकदिवसीय क्रिकेटमधील त्याची कामगिरी

एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत २९५ सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे, ज्यात त्याने ५८.१८ च्या सरासरीने १३ हजार ९०६ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने ५० शतके आणि ७२ अर्धशतकांचा समावेश आहे. या फॉरमॅटमध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या १८३ आहे. वनडेत सर्वाधिक धावा करणारा तो तिसरा आणि भारतीयांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे.

वनडेत ५० शतके झळकावणारा एकमेव खेळाडू

गेल्या वर्षी वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या विश्वचषक २०२३ च्या उपांत्य सामन्यात सचिन तेंडुलकरच्या विक्रमाला मागे टाकत एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५० शतके झळकावणारा विराट हा एकमेव खेळाडू आहे. 'किंग कोहली'ने ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत अनेक विक्रम केले आहेत. तो सर्वात जलद ८ हजार धावा, ९ हजार धावा, १० हजार धावा, ११ हजार धावा, १२ हजार धावा आणि १३ हजार धावा पूर्ण करणारा खेळाडू आहे.

एकदिवसीय क्रिकेटमधील ‘चेसमास्टर’

धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा आणि शतके झळकावणारा विराट ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये 'चेसमास्टर' आहे. अशा १०२ सामन्यात त्याने ९०.४० च्या शानदार सरासरीने ५ हजार ७८६ धावा केल्या आहेत, ज्यात ९६ डावांमध्ये २३ शतके आणि २५ अर्धशतकांचा समावेश आहे. २०१७-१८ च्या मोसमात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध च्या सहा सामन्यांत १८६.०० च्या सरासरीने ५५८ धावा करत एकदिवसीय द्विपक्षीय मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. त्याची सर्वोत्तम धावसंख्या १६०* होती.

२०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात दमदार फलंदाजी

आयसीसी क्रिकेट विश्वचषक आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाचा विराट एक भाग आहे. या स्पर्धांमध्ये त्याने अनेक संस्मरणीय खेळी केल्या आहेत. नुकताच झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात विराट कोहलीने दमदार फलंदाजी केली.  त्याने ११ सामन्यांत ९५.६२ च्या सरासरीने ७६५ धावा करत स्पर्धेचा समारोप केला, ज्यात तीन शतके आणि सहा अर्धशतकांचा समावेश होता. त्याची सर्वोत्तम धावसंख्या ११७ होती.

एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज

एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात विराटने ३७ सामन्यात ६९.८३ च्या सरासरीने १ हजार ७९५ धावा केल्या आहेत, ज्यात ५ शतके आणि १२ अर्धशतकांचा समावेश आहे. एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा तो दुसरा फलंदाज आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विराटने १३ सामन्यात ८८.१६ च्या सरासरीने ५२९ धावा केल्या आहेत, या स्पर्धेतील १२ डावात त्याने ५ अर्धशतके झळकावली आहेत.

उत्तम एकदिवसीय कर्णधार

विराट कोहली हा उत्तम एकदिवसीय कर्णधार देखील होता, त्याने संघाचे नेतृत्व केलेल्या ९५ पैकी ६५ एकदिवसीय सामने जिंकले. तर, २७ सामने गमावले आहेत आणि एक सामना बरोबरीत सुटला. त्याने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ मध्ये संघाला उपविजेतेपद आणि २०१९ मध्ये ५० षटकांच्या विश्वचषकाची उपांत्य फेरी पर्यंत पोहोचवले होते.

टी-२० क्रिकेटमधील कामगिरी

विराटने १२५ टी-२० आणि ११७ डावांमध्ये ४८.६९ च्या सरासरीने ४ हजार १८८ धावा केल्या आहेत, ज्यात एक शतक आणि ३८ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोत्तम धावसंख्या १२२* आहे. तो या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज आहे. विराटने टी-२० फॉरमॅटमध्ये ७ 'प्लेयर ऑफ द सीरिज' पुरस्कार जिंकले आहेत, जे कोणत्याही खेळाडूने केलेले सर्वाधिक पुरस्कार आहेत. २०२४ चा टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या संघातही तो होता, त्याने अंतिम सामन्यात ७६ धावांची खेळी केली होती.

टी-२० विश्वचषकात सर्वाधिक धावा 

टी-२० विश्वचषकातील विराटच्या कामगिरीमुळे तो स्पर्धेतील सर्वात मोठा स्टार बनला आहे. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात त्याने ३५ सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे, ज्यात त्याने ३३ डावांमध्ये ५८.७२ च्या सरासरीने १ हजार २९२ धावा केल्या आहेत. टी-२० विश्वचषक स्पर्धेत तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने २०१४ आणि २०१६ मध्ये 'प्लेयर ऑफ द टूर्नामेंट' पुरस्कार जिंकला होता.

Whats_app_banner