टीम इंडियातून बाहेर असलेला कसोटीपटू हनुमा विहारी सध्या रणजी ट्रॉफीमध्ये खेळत आहे. रणजी हंगामाच्या सुरुवातीला तो आंध्र क्रिकेट संघाचा कर्णधार होता. मात्र दुसऱ्या सामन्यापूर्वी विहारीने अचानक कर्णधारपद सोडले.
आता आंध्रचा संघ उपांत्यपूर्व फेरीत पराभूत होऊन रणजी ट्रॉफीतून बाहेर पडला आहे. यानंतर हनुमा विहारी याने काही धक्कादायक खुलासा केले आहेत. एका राजकीय नेत्याच्या मुलाला ओरडून बोलल्याने आपल्याला कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आल्याचे विहारी सांगितले आहे. यासह विहारीने स्पष्ट केले की, तो यापुढे आंध्र प्रदेश क्रिकेट संघाकडून खेळणार नाही.
हनुमा विहारी याने सोशल मीडियावर पोस्ट करून याबाबत माहिती दिली. विहारीने लिहिले की, ‘बंगालविरुद्धच्या पहिल्या सामन्यात मी कर्णधार होतो, त्या सामन्यादरम्यान मी एका १७व्या खेळाडूला ओरडलो आणि त्याने त्याच्या वडिलांकडे (जो नेता आहे) तक्रार केली, त्या बदल्यात त्याच्या वडिलांनी असोसिएशनला माझ्यावर कारवाई करण्यास सांगितले.
त्या सामन्यात आम्ही गेल्यावर्षीचा चॅम्पियन संघ बंगालविरुद्ध ४१० धावांचे लक्ष्य गाठले होते, पण तरी माझ्याकडून कर्णधारपद हिसकावून घेण्यात आले, मला कर्णधारपदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आले."
तसेच, हनुमा विहारी याने शेवटी लिहिले, की तो आंध्रसाठी पुन्हा कधीही खेळणार नाही. विहारीने लिहिले, “मी आता ठरवले आहे की मी आंध्रसाठी कधीही खेळणार नाही, जिथे माझा स्वाभिमान दुखावला आहे. मला तो संघ आवडतो. प्रत्येक हंगामात आपण ज्या प्रकारे चांगले करत आहोत, ते मला आवडते पण असोसिएशनला आपण वाढू नये असे वाटते”.
हनुमा विहारीने पोस्टमध्ये कोणाचेही नाव लिहिलेले नव्हते. पण संघातील विकेटकीपर फलंदाज केएन पृथ्वीराज यानेही एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमधून त्याने सांगितले, “ ”मीच तो व्यक्ती आहे, ज्याला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये शोधत आहात. तुम्ही जे ऐकले ते पूर्णपणे खोटे आहे, खेळापेक्षा कोणीही मोठे नाही. तसेच, माझा स्वाभिमान कोणत्याही गोष्टीपेक्षा खूप मोठा आहे. कोणत्याही व्यासपीठावर वैयक्तिक हल्ले आणि द्वेषयुक्त भाषा अस्वीकार्य आहे. त्या दिवशी काय घडले होते हे संघातील प्रत्येकाला माहीत आहे. तुम्हाला पाहिजे तसा सहानुभूतीचा खेळ तुम्ही खेळत राहा".
संबंधित बातम्या