लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात गुरुवार (२९ ऑगस्ट) कसोटी सामना खेळला जात आहे. या कसोटीचा आज (३० ऑगस्ट) दुसरा दिवस आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी माजी कर्णधार जो रूटने शतक झळकावले, तर दुसऱ्या दिवशी खेळ सुरू झाला तेव्हा संघात गोलंदाज म्हणून खेळणाऱ्या गस ऍटकिन्सन यानेही शतक झळकावले.
सामन्याचा दुसरा दिवस सुरू असून इंग्लंड संघाने सामन्यावर आपली पकड मजबूत केली आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकून इंग्लंड संघाने आघाडी घेतली आहे. गस ऍटकिन्सनचे हे पहिलेच कसोटी शतक आहे आणि ते लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर आले आहे, त्यामुळे ते आणखी खास झाले आहे.
इंग्लंड विरुद्ध श्रीलंका लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या दिवसापर्यंत इंग्लंड संघाने पहिल्या डावात सर्वबाद ४२७ धावा केल्या. आता श्रीलंकेचा पहिला डाव सुरू आहे.
तत्पूर्वी, पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत गस ऍटकिन्सन ७४ धावा करून नाबाद परतला होता. तर मॅथ्यू पॉट २० धावा करून खेळत होता. म्हणजे दुसऱ्या दिवसाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे ॲटकिन्सनचे शतकहोते. दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या पहिल्या दोन चेंडूंवर चौकार मारून ॲटकिन्सनने आपले इरादे स्पष्ट केले होते.
दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर तो बाद झाला होता. पण त्याने रिव्ह्यूचा अवलंब केला आणि थोडक्यात बचावला. त्याने आपले पहिले कसोटी शतक पूर्ण करण्यासाठी केवळ १०३ चेंडूंचा सामना केला. त्याने चौकार मारून आपले शतक पूर्ण केले.
लॉर्डस कसोटीत श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ४२७ धावा केल्या. इंग्लंडकडून जो रूटने सर्वाधिक १४३ धावा केल्या. त्याने २०६ चेंडूत १८ चौकार मारले. तर एटकिन्सनने ११८ धावा केल्या. त्याने ११५ चेंडूत १४ चौकार आणि ४ षटकार ठोकले.
दरम्यान, तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने जिंकला आहे. मालिका वाचवण्यासाठी श्रीलंकेला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावाच लागेल. विशेष बाब म्हणजे ही मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत खेळवली जात आहे, त्यामुळे या सामन्यातील विजय किंवा पराभवाचा परिणाम डब्ल्यूटीसीच्या गुणतालिकेवरही होणार आहे. सध्या, इंग्लंड संघ WTC गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे आणि श्रीलंका संघ पाचव्या स्थानावर आहे.