मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Mohammed Shami : मोहम्मद शमी आयपीएल २०२४ मधून बाहेर, गुजरात टायटन्सला मोठा धक्का

Mohammed Shami : मोहम्मद शमी आयपीएल २०२४ मधून बाहेर, गुजरात टायटन्सला मोठा धक्का

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 22, 2024 03:59 PM IST

Mohammed Shami Out of IPL 2024 : डाव्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे मोहम्मद शमी आयपीएल २०२४ मधून बाहेर पडला आहे.

Mohammed Shami
Mohammed Shami (PTI)

IPL 2024: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी डाव्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे आयपीएल 2024 मधून बाहेर पडला आहे. शमी गुजरात टायटन्सच्या आघाडीचा गोलंदाज आहे. यापूर्वी हार्दिक पांड्याच्या रुपात गुजरातला मोठा धक्का बसला आहे. यात मोहम्मद शमीच्या दुखापतीने आणखी भर टाकली आहे. यावेळी युवा फलंदाज शुभमन गिलच्या नेतृत्त्वात गुजरातचा संघ मैदानात उतरणार आहे.

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात पदार्पण करणाऱ्या गुजरातच्या संघाने आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. गुजरातने त्यांच्या पहिल्याच हंगामात आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरले. त्यानंतर गेल्यावर्षी अंतिम फेरीपर्यंत पोहोचले. मात्र, एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जकडून पराभूत झाल्यानंतर त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

या दोन्ही हंगामात शमीने गुजरातच्या यशात मोलाचा वाटा उचलला होता. शमीने २०२२ मध्ये २०आणि २०२३ मध्ये २८ विकेट्स घेतले. शमी विशेषत: नव्या चेंडूने घातक ठरला. गुजरातकडून बदली खेळाडूची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु, डिसेंबरमध्ये झालेल्या आयपीएल लिलावादरम्यान अनसोल्ड झालेल्या खेळाडूंच्या यादीतून बदली खेळाडू निवडण्याची परवानगी देण्यात आली आहे.

इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेचा भाग नसलेला शमी नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताकडून शेवटचा सामना खेळला होता. शमीच्या डाव्या पायाच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे आणि त्यावर शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय आहे. शस्त्रक्रियेसाठी तो लवकरच ब्रिटनला रवाना होईल.

या घडामोडींमुळे शमीसाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने (एनसीए) आखलेल्या दुखापत पुनर्वसन व्यवस्थापन कार्यक्रमावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बांगलादेश आणि न्यूझीलंडविरुद्ध (ऑक्टोबर, नोव्हेंबर) घरच्या मैदानावर होणाऱ्या कसोटी सामन्यांपूर्वी हा वेगवान गोलंदाज पुनरागमन करू शकेल, अशी शक्यता फार कमी आहे. तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत खेळताना दिसू शकतो.

IPL_Entry_Point