मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  मनीष पांडे, मयंक अग्रवालला १०९ धावा करता आल्या नाहीत, गुजरातनं अवघ्या ६ धावांनी सामना जिंकला

मनीष पांडे, मयंक अग्रवालला १०९ धावा करता आल्या नाहीत, गुजरातनं अवघ्या ६ धावांनी सामना जिंकला

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 15, 2024 04:17 PM IST

Gujarat vs Karnataka Ranji Trophy : कर्नाटकाच्या संघात मयंक अग्रवाल, देवदत्त पडिक्कल, मनीष पांडे आणि प्रसिद्ध कृष्णा यांसारख्ये खेळाडू आहेत, पण त्यांना १०९ धावा करता आल्या नाहीत. कर्नाटकची अवस्था एकवेळ बिनबाद ५० धावा होती.

Gujarat vs Karnataka, Ranji Trophy
Gujarat vs Karnataka, Ranji Trophy

Gujarat vs Karnataka, Ranji Trophy 2023-24 : रणजी ट्रॉफीमध्ये गुजरातने कर्नाटकचा अवघ्या ६ धावांनी पराभव केला. एलिट गट क मधील हा सामना  अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. हा सामना जिंकण्यासाठी कर्नाटकसमोर अवघ्या १०९ धावांचे लक्ष्य होते, पण कर्नाटकाचा संघ अवघ्या १०३ धावांवर गारद झाला.

कर्नाटकाच्या संघात मयंक अग्रवाल, देवदत्त पडिक्कल, मनीष पांडे आणि प्रसिद्ध कृष्णा यांसारख्ये खेळाडू आहेत, पण त्यांना १०९ धावा करता आल्या नाहीत. कर्नाटकची अवस्था एकवेळ बिनबाद ५० धावा होती.

पण यानंतर गुजरातचा फिरकी गोलंदाज सिद्धार्थ देसाईने ७ विकेट घेत कर्नाटकला पुढच्या ५३ धावांत ऑल आऊट केले.

तत्पूर्वी, या सामन्यात कर्नाटकचा कर्णधार मयंक अग्रवालने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर गुजरातने पहिल्या डावात क्षितिज पटेल (९५) आणि उमंग कुमार (७२) यांच्या खेळीमुळे २६४ धावा केल्या. कर्नाटककडून वासुकी कौशिकने ४ तर प्रसिध कृष्णा, रोहित कुमार, शुभांग हेगडे आणि विजयकुमार यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

 पहिल्या डावात मयंक अग्रवालचे शतक 

प्रत्युत्तरात कर्नाटकाकडून सलामीवीर आर समर्थ (७२) आणि कर्णधार मयंक अग्रवाल यांनी कर्नाटकला दमदार सुरुवात करून दिली. अग्रवालने अवघ्या १२४ चेंडूंत १७ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १०९ धावांची खेळी केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १७२ धावांची भागीदारी केली. 

देवदत्त पडिक्कलने ४२ धावांची तर अनुभवी फलंदाज मनीष पांडेने ८८ धावांची खेळी केली. यामुळे कर्नाटक संघाला पहिल्या डावात ३७४ धावा करण्यात यश आले. पहिल्या डावाच्या आधारे कर्नाटककडे ११० धावांची आघाडी होती.

गुजरातचा दुसरा डाव २१९ धावांवर सर्वबाद

गुजरातचा संघ दुसऱ्या डावात विशेष काही करू शकला नाही. संघाच्या ४ विकेट केवळ ५२ धावांत पडल्या. यानंतर मनन हिंगराजिया (५६) आणि क्षितिज पटेल (२६) यांनी डाव सांभाळला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी केली. तर उमंग कुमारने (५६) सलग दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले.

गुजरातचा दुसरा डाव केवळ २१९ धावांवर सर्वबाद झाला. अशाप्रकारे कर्नाटकला केवळ १०९ धावांचे लक्ष्य मिळाले.

कर्नाटकाचे दिग्गज देसाईसमोर ढेर

कर्नाटकच्या फलंदाजांची फौज पाहता हे लक्ष्य त्यांच्यासाठी अतिशय सोपे होते. लक्ष्याचा पाठलाग करताना कर्नाटकने ९.२ षटकात ५० सहज धावा केल्या होत्या. पण त्यानंतर सिद्धार्थ देसाईने जादू दाखवली. डावखुरा फिरकीपटू देसाईने ४२ धावांत ७ बळी घेतले. देसाईला रिंकेश वाघेलाने सुरेख साथ दिली. वाघेलाने ३ बळी घेतले. अशाप्रकारे कर्नाटकचा संपूर्ण संघ अवघ्या १०३ धावांत ऑलआऊट झाला.

WhatsApp channel