GT Vs DC : गुजरातचा लाजिरवाणा पराभव, दिल्ली कॅपिटल्सने अवघ्या ८.५ षटकांत सामना जिंकला
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  GT Vs DC : गुजरातचा लाजिरवाणा पराभव, दिल्ली कॅपिटल्सने अवघ्या ८.५ षटकांत सामना जिंकला

GT Vs DC : गुजरातचा लाजिरवाणा पराभव, दिल्ली कॅपिटल्सने अवघ्या ८.५ षटकांत सामना जिंकला

Apr 17, 2024 10:47 PM IST

GT Vs DC IPL : आयपीएल २०२४ मध्ये आज गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने होते. या सामन्यात दिल्लीने एकतर्फी विजय मिळवला.

GT vs DC Indian Premier League 2024
GT vs DC Indian Premier League 2024 (PTI)

इंडियन प्रीमियर लीग २०२४ चा ३२ वा सामना (१७ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सचा ६ गडी राखून पराभव केला आणि गुणतालिकेत सहावे स्थान मिळवले. आता संघाच्या खात्यात ६गुणांची नोंद झाली आहे. त्याचबरोबर गुजरातचा संघ सातव्या स्थानावर घसरला आहे. दोन्ही संघांच्या खात्यात समान गुण आहेत. या सामन्यात दिल्लीच्या गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत गुजरातला अवघ्या ८९ धावांवर ऑलआउट केले. प्रत्युत्तरात दिल्लीने ६७ चेंडू बाकी असताना ६ विकेट्स राखून लक्ष्य गाठले.

लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात चांगली झाली. पृथ्वी शॉ आणि जॅक फ्रेझर-मॅकगर्क यांच्यात पहिल्या विकेटसाठी २५ धावांची भागीदारी झाली. यानंतर स्पेन्सर जॉन्सनने संघाला पहिला धक्का दिला. त्याने मॅकगर्कची शिकार केली. त्याला दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने २० धावा करता आल्या. तर शॉ केवळ सात धावा करू शकला.

या सामन्यात अभिषेक पोरेलने १५, शाई होपने १९, ऋषभ पंतने १६ आणि सुमित कुमारने ९ धावा केल्या. पंत आणि सुमित नाबाद राहिले. गुजरातकडून संदीप वारियरने २ बळी घेतले. तर स्पेन्सर जॉन्सन आणि राशिद खान यांना प्रत्येकी एक विकेट मिळाला.

गुजरात वि. दिल्ली क्रिकेट स्कोअर

दिल्ली कॅपिटल्सला पहिला धक्का

दिल्ली कॅपिटल्सला पहिला धक्का २५ धावांवर बसला. स्पेन्सर जॉन्सनने डावाच्या दुसऱ्या षटकात जॅक फ्रेझर-मॅकगर्कला बाद केले. १० चेंडूत २० धावा करून तो बाद झाला. अभिषेक पोरेल हा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे.

गुजरातचा संघ ८८ धावांवर ऑलआऊट

गुजरातचा संघ ८८ धावांवर ऑलआऊट झाला. दिल्ली कॅपिटल्ससमोर विजयासाठी ९० धावांचे लक्ष्य आहे. या सामन्यात रशीद खानशिवाय गुजरातचा एकही फलंदाज जास्त काळ विकेटवर टिकू शकला नाही. त्याने सर्वाधिक ३१ धावा केल्या.

आयपीएलच्या इतिहासात गुजरातची ही सर्वात कमी धावसंख्या आहे. त्यांच्याकडून राशिद खानने सर्वाधिक ३१ धावा केल्या. दिल्लीकडून मुकेश कुमारने ३ बळी घेतले. तर ट्रस्टन स्टब्स आणि इशांत शर्मा यांना प्रत्येकी दोन विकेट मिळाले.

गुजरातचे ८ फलंदाज बाद

गुजरातचे फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतण्याची प्रक्रिया सुरूच आहे. संघाला आता आठवा धक्का बसला आहे. खलील अहमदने मोहित शर्माला ७८ धावांवर बाद केले. शर्माला केवळ ४ धावा करता आल्या. सध्या रशीद खान क्रीजवर उपस्थित आहे.

गुजरातला तिसरा धक्का

साई सुदर्शनच्या रूपाने गुजरातला तिसरा धक्का बसला. त्याला सुमित कुमारने धावबाद केले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सुदर्शनला केवळ १२ धावा करता आल्या.

गुजरातला दुसरा धक्का

गुजरातला दुसरा धक्का रिद्धिमान साहाच्या रूपाने बसला. त्याला मुकेश कुमारने क्लीन बोल्ड केले. त्याला केवळ २ धावा करता आल्या. डेव्हिड मिलर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. ४ षटकांनंतर संघाची धावसंख्या २८/२ आहे.

गुजरातला पहिला धक्का

गुजरातला पहिला धक्का ११ धावांच्या स्कोअरवर बसला. डावाच्या दुसऱ्याच षटकात शुभमन गिलला इशांत शर्माने पृथ्वी शॉकरवी झेलबाद केले. या सामन्यात शुभमन गिलला केवळ ८ धावा करता आल्या. साई सुदर्शन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. त्याचवेळी ऋद्धिमान साहा त्याला साथ देण्यासाठी क्रीजवर उपस्थित आहे.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, स्पेन्सर जॉन्सन, संदीप वॉरियर. 

इम्पॅक्ट सब: शरथ बीआर, मानव सुथार, शाहरुख खान, रविश्रीनिवासन साई किशोर, दर्शन नळकांडे.

दिल्ली कॅपिटल्स: पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, ट्रिस्टन स्टब्स, शाई होप, ऋषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मुकेश कुमार, खलील अहमद.

इम्पॅक्ट सब: अभिषेक पोरेल, लिझाद विल्यम्स, कुमार कुशाग्रा, प्रवीण दुबे, ललित यादव.

दिल्लीने टॉस जिंकला

दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातविरुद्धच्या या सामन्यात डेव्हिड वॉर्नर खेळणार नसल्याचे पंतने सांगितले. त्याच्या जागी सुमित कुमारला संधी देण्यात आली आहे. त्याचवेळी ऋद्धिमान साहा आणि डेव्हिड मिलर गुजरातच्या प्लेइंग ११ मध्ये परतले आहेत. याशिवाय संदीप वारियरला पदार्पणाची संधी मिळाली आहे.

Whats_app_banner