ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना क्राइस्टचर्च येथे खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात केवळ १६२ धावा केल्या. यानंतर न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात २५६ धावात ऑलआऊट केले.
न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने ७ विकेट घेतल्या. तर ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लॅबुशेनने ९० धावा केल्या. त्याला शतक पूर्ण करता आले नाही. कारण ग्लेन फिलिप्सने अप्रतिम झेल घेऊन त्याचा डाव संपवला.
ऑस्ट्रेलियाच्या डावातील ६१ व्या षटकात टीम साऊथी गोलंदाजी करत होता. या षटकातील एका चेंडूवर लॅबुशेनने ऑफ साइडवर शानदार कट शॉट खेळला. चेंडू हवेत गेला परंतु पॉइंटवर क्षेत्ररक्षणासाठी तैनात असलेल्या ग्लेन फिलिप्सने कमाल केली. फिलिप्सने पूर्णपणे हवेत झेप घेत एका हाताने झेल घेतला आणि लॅबुशेनचा डाव संपवला.
ग्लेन फिलिप्सचा हा झेल इतका जबरदस्त होता की, तो पाहून लॅबुशेनसह संपूर्ण खेळाडू आणि प्रेक्षक थक्क झाले होते. लॅबुशेन ९० धावा करून बाद झाला. या डावात त्याने १४७ चेंडूंचा सामना केला आणि १२ चौकार मारले.
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही ऑस्ट्रेलियाची फलंदाजी अगदीच सामान्य झाली. मार्नस लॅबुशेन वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला आपले कौशल्य दाखवता आले नाही. यामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव २५६ धावांवर आटोपला, मात्र तरीही संघाला ९४ धावांची भक्कम आघाडी मिळाली. आता न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजी करत आहे.