Pakistan vs New Zealand, 1st ODI : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ आधी पाकिस्तानमध्ये तिरंगी एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात नुतनीकरण करण्यात आलेल्या लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळला जात आहे.
या सामन्यानेच या स्टेडियमचे उद्घाटन झाले. पण या मैदानावरील पहिली मालिका आणि सामना पाकिस्तानी गोलंदाजांसाठी दुःस्वप्नसारखा ठरला. कारण न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्स याने लाहोरमध्ये स्फोटक फलंदाजी करत शतक झळकावले. पाकिस्तानविरुद्ध त्याने अप्रतिम कामगिरी केली.
वास्तविक, या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानला विजयासाठी ३३१ धावांचे लक्ष्य दिले आहे. यादरम्यान न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने स्फोटक फलंदाजी केली. त्याने ७ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने नाबाद शतक झळकावले.
फिलिप्सने शेवटच्या षटकांमध्ये तुफान फटकेबाजी केली. त्याने पाकिस्तानी गोलंदाजांना चांगलाची धुलाई केली. न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेल आणि केन विल्यमसन यांनी अर्धशतके झळकावली.
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान संघाने ५० षटकांत ६ गडी गमावून ३३० धावा केल्या. संघासाठी रचिन रवींद्र आणि विल यंग सलामीला आले. यंग ४ धावा करून बाद झाला. तर रचिन २५ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
विल्यमसनने ७ चौकारांच्या मदतीने ५८ धावा केल्या. तर डॅरिल मिशेलने ४ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने ८१ धावा केल्या.
ग्लेन फिलिप्स संघाकडून सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. या दरम्यान त्याने ७४ चेंडूंचा सामना करत नाबाद १०६ धावा केल्या. फिलिप्सने ६ चौकार आणि ७ षटकार मारले. त्याने डावाच्या शेवटच्या षटकात २ चौकार आणि २ षटकार मारले. शाहीन आफ्रिदीची ही ओव्हर होती. या षटकात आफ्रिदीने एकूण २५ धावा दिल्या.
पाकिस्तानसाठी शाहीन आफ्रिदीने १० षटके टाकली. या काळात त्याने ८८ धावांत ३ बळी घेतले. अबरार अहमदने १० षटकात ४१ धावा देत २ बळी घेतले. हरिस रौफ संघासाठी अत्यंत किफायतशीर ठरला. त्याने ६.२ षटकात २३ धावा देत १ बळी घेतला.
नसीम शाहला एकही विकेट मिळाली नाही. त्याने १० षटकात ७० धावा दिल्या. सलमान आगाने ४.४ षटके टाकली. त्याने ३१ धावा दिल्या. मात्र एकही विकेट मिळवता आली नाही.
संबंधित बातम्या