अनेकदा क्रिकेट खेळाडू भर मैदानात एकमेकांना भिडतात. यामागचा हेतू फक्त फलंदाज किंवा गोलंदाजाचे लक्ष विचलित करणे हा आहे, जेणेकरून चांगली गोलंदाजी किंवा फलंदाजी करत असलेल्या खेळाडूची एकाग्रता भंग होईल.
बऱ्याच प्रसंगी वेगवान गोलंदाज अधिक स्लेजिंग करताना दिसतात. यात सर्वाधिक प्रमाण ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे आहे.
ग्लेन मॅकग्रा ऑस्ट्रेलियाच्या महान वेगवान गोलंदाजांपैकी एक. तो त्याच्या जबरदस्त लाईन-लेन्थसाठी ओळखला जायचा. परंतु असे बरेच प्रसंग आले जेव्हा तो चांगली गोलंदाजी करूनही विकेट घेऊ शकला नाही आणि त्याने फलंदाजाला बाद करण्यासाठी स्लेजिंगचा अवलंब केला.
मात्र, एकदा मॅकग्राची स्लेजिंग त्याच्यावरच उलटली होती. कारण त्याच्यासमोर उभ्या असलेल्या फलंदाजाने मॅकग्राला असे उत्तर दिले की तो ते सहन करू शकला नाही आणि त्या फलंदाजाचे शब्द त्याच्या डोक्यात बराच वेळ गोंधळ घालत राहिले.
ऑस्ट्रेलियन संघ २००३ मध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर होता आणि त्यांनी ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिले तीन सामने जिंकून मालिका जिंकली होती. मॅकग्रा या मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यात खेळला नाही. कारण तो त्याची पत्नी जेनसोबत ऑस्ट्रेलियात होता.
जेनला कर्करोग झाला होता आणि त्याला आपल्या पत्नीसोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचा होता. परंतु त्याची पत्नी जेनने मॅकग्राला खेळण्याची विनंती केली, त्यानंतर तो वेस्ट इंडिज दौऱ्यावर आला आणि केन्सिंग्टन ओव्हल येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीत खेळला. हा सामना ऑस्ट्रेलियाने ९ विकेट्सनी जिंकला. पण या सामन्यात मॅकग्राला एकही विकेट मिळाली नाही.
यानंतर मालिकेतील चौथा कसोटी सामना सेंट जॉन्समध्ये खेळवला गेला. सेंट जॉन्स कसोटीत हेडन आणि लँगरने शतके झळकावून ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ४१७ धावांपर्यंत नेली. यानंतर प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजची सुरुवात नेहमीप्रमाणे खराब झाली आणि त्यांनी ७४ धावांत ३ विकेट गमावल्या. कर्णधार ब्रायन लाराने ६० धावा केल्या पण तो मॅकगिलचा बळी ठरला, इथून ऑस्ट्रेलियाने आपला विजय पाहायला सुरुवात केली.
पण लारा गेल्यानंतर शिवनारायण चंद्रपॉल आणि रामनरेश सरवन हे दोन भारतीय वंशाचे खेळाडू क्रीजवर राहिले. दोघांनी संघाची धावसंख्या २३७ धावांपर्यंत नेली आणि यानंतर ऑस्ट्रेलियन संघाला विकेट न मिळाल्याने त्यांची चिडचिड होऊ लागली. सरवन आणि चंदरपॉलसमोर ऑस्ट्रेलियन गोलंदाज फ्लॉप ठरत होते, तेव्हा मॅकग्राने स्लेजिंगचा वापर करण्याची रणनीती आखली.
सरवन मॅकग्राचे चेंडू आरामात खेळत होता, तो त्याच्या चेंडूंवर चौकार मारत होता, हे पाहून मॅकग्राने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. अशा स्थितीत एक चेंडू टाकल्यानंतर मॅकग्राने मर्यादा ओलांडली. प्रत्युत्तरात सरवाननेही त्याच भाषेत मॅकग्राला उत्तर दिले.
वास्तविक, सरवानने मॅकग्राचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला आणि रन घेण्यासाठी धावला. तेव्हा तो दुसऱ्या टोकाला जात असताना मॅकग्राने त्याच्यासाठी अतिशय वाईट शब्द वापरले. मॅकग्राने सरवनला लाराशी जोडून अपशब्द वापरले. यावर क्षणार्धात सरवानने मॅकग्राला उत्तर दिले आणि म्हटले की 'मला माहित नाही, जा आणि तुझ्या बायकोला विचार.'
सरवनचे हे उत्तर ऐकून मॅकग्राची चांगलीच सटकली. तो रागाने लालबुंद झाला. त्याने सरवनकडे बोट दाखवत म्हटले, 'आता माझ्या पत्नीबद्दल काही बोललास तर मी तुझा गळा कापून टाकेन'
प्रकरण इतके वाढले की ऑस्ट्रेलियन खेळाडू जस्टिन लँगरही सरवनशी बोलायला आला, ॲडम गिलख्रिस्टही तिथेच उभा होता. अंपायरला हस्तक्षेप करावा लागला.
रामनरेश सरवनच्या या उत्तराने ऑस्ट्रेलियन खेळाडू इतके का चिडले हे त्याला समजले नाही. मॅकग्राची पत्नी कॅन्सरशी झुंज देत आहे हे सरवानला माहीत नव्हते. नंतर सरवानला जेव्हा हे कळले तेव्हा त्याला त्याच्या बोलण्याचा खूप पश्चाताप झाला.
कसोटी सामना संपल्यानंतर मॅकग्रा आणि सरवान यांनी एकमेकांना भेटून त्यांच्या तक्रारींचे निरसन केले. मॅकग्राने नंतर कबूल केले की त्याने हे करायला नको होते. दोघांनी एकमेकांची माफी मागितली.
सामन्यानंतर सरवन आणि मॅकग्रा यांच्यातील तक्रारी दूर झाल्या, पण वेस्ट इंडिजने नेत्रदीपक शैलीत हा सामना जिंकला.
सरवनने १०५ धावांची खेळी केली, तर चंद्रपॉलनेही १०४ धावा केल्या. ८व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ओमारी बँक्सने नाबाद ४७ आणि वेसबर्ट ड्रेक्सने २७ धावा करत ४१८ धावांचे लक्ष्य गाठले आणि वेस्ट इंडिजने हा सामना तीन गडी राखून जिंकला.
संबंधित बातम्या