ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल याने तुफानी कामगिरी केली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या ब्रिस्बेन टी-20 सामन्यात त्याने ४३ धावांची शानदार खेळी केली. मॅक्सवेलने या खेळीत ५ चौकार आणि ३ षटकार मारले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याने नसीम शाहची खूप धुलाई केली. नसीमच्या एका षटकात मॅक्सवेलने चार चौकार मारले.
मॅक्सवेलला रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावाआधी रीलीज केले होते. ही खेळी पाहून त्याला आता मेगा लिलावात मोठी रक्कम मिळू शकते.
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात टी-20 मालिका खेळली जात आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ७ षटकांत ४ गडी गमावून ९३ धावा केल्या. पावसामुळे हा सामना प्रत्येकी ७ षटकांचा खेळला गेला.
यादरम्यान मॅक्सवेल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने १९ चेंडूंचा सामना करताना ४३ धावा केल्या. मॅक्सवेलच्या या खेळीत ५ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. मॅक्सवेलने पाकिस्तानी गोलंदाजांची तुफान धुलाई केली. नसीम शाहने २ षटकात ३७ धावा दिल्या.
IPL २०२५ चा मेगा लिलाव २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. याआधी मॅक्सवेलने धमाका केला आहे. तो बराच काळ रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा भाग होता. मात्र आरसीबीने त्याला रिटेन केले नाही. आता मॅक्सवेल लिलावात उतरणार आहे. येथे त्याला मानधन म्हणून मोठी रक्कम मिळू शकते.
मॅक्सवेल हा अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत १३४ आयपीएल सामने खेळले आहेत. मॅक्सवेलने या कालावधीत २७७१ धावा केल्या आहेत. मॅक्सवेलने या स्पर्धेत १८ अर्धशतके झळकावली आहेत. गोलंदाजीतही त्याने कमाल दाखवली आहे. मॅक्सवेलने गोलंदाजीत ३७ विकेट्सही घेतल्या आहेत. एका सामन्यात १५ धावांत २ बळी घेणे ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.