इंग्लंडचा महान फलंदाज जो रूट सध्या चर्चेचा विषय बनला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात रुटने दोन्ही डावांत शतके झळकावून रेकॉर्ड बनवला. सलग दोन शतके झळकावल्यानंतर रुटची तुलना दिग्गज फलंदाजांशी केली जात असून त्यात सचिन तेंडुलकरचाही समावेश आहे.
सोबतच आता जो रूट आणि विराट कोहली यांच्यात महान कोण, अशीही चर्चा सुरू झाली आहे.
विराट कोहली आणि जो रूट यांच्यात सर्वोत्तम कोण? या वादावर ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज ॲडम गिलख्रिस्टने अतिशय मजेशीर उत्तर दिले आहे. यावेळी इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनही उपस्थित होता. वॉननेही आपली बाजू मांडली.
क्लब प्रेरी फायर पॉडकास्टवर बोलताना, गिलख्रिस्ट म्हणाला, की "बऱ्याच काळापासून, जो रूटची आकडेवारी खूपच चांगली आहे, तो इंग्लंडने पाहिलेला सर्वोत्तम खेळाडू आहे."
तो पुढे म्हणाला, "विराटने पर्थ स्टेडियमवर कसोटी शतक केले होते, ते शतक मी पाहिलेल्या सर्वोत्तम शतकांपैकी एक होते. हे कदाचित एक वेगळ्याच प्रकारचे शतक असेल. म्हणून विराट म्हणेन." गिलख्रिस्टने स्पष्ट केले की, त्याच्या मते विराट कोहली सध्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाज आहे.
तेव्हा मायकेल वॉन म्हणाला, "मी ऑस्ट्रेलियात बसून याच्याशी वाद घालणार नाही. त्यामुळे मी म्हणेन की ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियासंघाविरुद्ध विराट, बाकी कुठेही मी जो रूटसोबत जाईन."
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या दोन्ही डावांत शतके झळकावून जो रूटने इंग्लंडचा माजी फलंदाज ॲलिस्टर कुकचा विक्रम मोडला. आपले ३४ वे शतक झळकावून, रूट इंग्लंडसाठी कसोटीत सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज ठरला. इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात अजून तिसरी कसोटी खेळली जाणार आहे, ज्यामध्ये सर्वांच्या नजरा जो रूटवर असतील.