GG vs UPW Women’s Premier League 2024 : महिला प्रीमियर लीग २०२४ चा १८ वा सामना आज (११ मार्च) दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर गुजरात जायंट्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि २० षटकात १५२ धावा केल्या.
प्रत्युत्तरात, युपीला २० षटकात ५ बाद १४४ धावाच करता आल्या. अशाप्रकारे गुजरातने युपी वॉरियर्सचा ८ धावांनी पराभव करत मागील पराभवाचा बदला घेतला.
लक्ष्याचा पाठलाग करताना युपीकडून दीप्ती शर्मा आणि पूनम खेमनार यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली, मात्र त्या संघाला विजयापर्यंत नेऊ शकल्या नाहीत.
दीप्तीने ६० चेंडूत नाबाद ८८ धावा केल्या. तिने ९ चौकर आणि ४ षटकार मारले. तर पुनम खेमनारने ३६ चेंडूत ३६ धावा केल्या. युपीची कर्णधार एलीसा हीली, चमारी अट्टापट्टू आणि ग्रेस हॅरिससारखे इतर फलंदाज फ्लॉप झाले.
तत्पूर्वी, या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरात जायंट्सने धमाकेदार सुरुवात केली होती. कर्णधार बेथ मुनीने नाबाद अर्धशतक झळकावले. तिने ५२ चेंडूत ७४ धावा केल्या. मुनीने लॉरा वॉल्वार्ड सोबत पहिल्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी केली. २४ वर्षीय वॉल्वार्ड आठव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर ४३ धावा काढून बाद झाली.
नवव्या षटकानंतर गुजरातची फलंदाजी ढासळली. फोबी लिचफील्ड ४, ॲश्ले गार्डनर १५, भारती फुलमाळी १, कॅथरीन ब्राइस ११ धावा करून बाद झाले. पण बेथ मुनी शेवटपर्यंत नाबाद राहत संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले.
यूपीकडून सोफी एक्लस्टोने ३ तर दीप्तीने दोन फलंदाज बाद केले. याशिवाय राजेश्वरी गायकवाड व चामरी अटापट्टू यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.