Jasprit Bumrah Akash Deep Batting, Ind vs Aus : जसप्रीत बुमराह आणि आकाशदीप यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या गाबा कसोटीत कमाल करून दाखवली. या सामन्याच्या चौथ्या दिवशीच्या (१७ डिसेंबर) शेवटच्या सत्रात टीम इंडियाने थरारक कामगिरी केली.
जसप्रीत बुमराह आणि आकाशदीप यांनी शेवटच्या सत्रात दमदार फलंदाजी करत टीम इंडियाला फॉलोऑनपासून वाचवले. भारताची ९वी विकेट पडली तेव्हा टीम इंडियाला फॉलोऑन वाचवण्यासाठी ३३ धावांची गरज होती. तेव्हा बुमराह-आकाशदीपने कमाल केली.
फॉलोऑन वाचवण्यासाठी भारताला २४६ धावा करायच्या होत्या. पण भारताची धावसंख्या २४२ धावा झाली असताना आकाश दीपने चौकार मारून काम पूर्ण केले. भारताचे फॉलोऑन टळताच ड्रेसिंग रूममध्ये वरिष्ठ खेळाडूंनी जल्लोष केला. विराट कोहली आणि गौतम गंभीर यांनी एकमेकांना टाळ्या दिल्या. या जंगी सेलिब्रेशनचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आज चहापानानंतर खेळ सुरू झाला तेव्हा पहिल्याच षटकात ऑस्ट्रेलियाने मोहम्मद सिराजला बाद केले. त्यावेळी टीम इंडियाची धावसंख्या ८ विकेट्सवर २०१ धावा होती. यानंतर सेट फलंदाज रवींद्र जडेजाही २१३ धावांवर बाद झाला.
येथून बुमराह आणि आकाशदीपच्या जोडीने एक एक धाव घेत टीम इंडियाला २४५ धावांच्या पुढे नेले.
रवींद्र जडेजा बाद झाल्यावर फॉलोऑन वाचवण्यासाठी टीम इंडियाला ३३ धावांची गरज होती. तर गोलंदाजीत ऑस्ट्रेलियाचे पॅट कमिन्स आणि नॅथन लायनसारखे गोलंदाज भारताच्या या शेवटच्या जोडीला बाद करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होते.
पण टीम इंडियाच्या या दोन खेळाडूंनी चांगल्या चेंडूंना मान देत, खराब चेंडूंवर चौकार लगावले आणि आवश्यक ३३ धावा करून भारतीय ड्रेसिंग रुममध्ये जीवात जीव आणला.
अशा प्रकारे, दिवसअखेर आकाशदीप सिंग ३१ चेंडूत २७ धावा तर जसप्रीत बुमराह १० धावांवर नाबाद परतले आहेत. दिवसअखेर भारताने ९ बाद २५२ धावा केल्या होत्या. मात्र अजूनही ऑस्ट्रेलियाकडे १९३ धावांची आघाडी आहे.
अशा स्थितीत खेळाच्या शेवटच्या दिवशीची स्पर्धा रोमांचक बनली आहे. तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने आपल्या डावात ४४५ धावा केल्या होत्या.
संबंधित बातम्या