गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्या मुलाखतीने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. गंभीर आणि विराट बीसीसीआय टीव्हीवर एकत्र आले होते. गंभीरने विराटला त्याच्या कारकिर्दीबाबत अनेक रोचक प्रश्न विचारले. यावेळी मुलाखतीत विराटने सांगितले की, तो खूप आध्यात्मिक आहे. गंभीरनेही असाच उल्लेख केला.
गंभीर आणि विराटमधील वादाच्या अनेक बातम्या येत असतात. दोघेही आयपीएलमध्ये एकमेकांशी भिडले होते. या प्रकरणाने सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडवली होती. गंभीर आणि विराटचे चाहतेही सोशल मीडियावर भिडले होते.
पण आता दोघांचे बॉन्डिंग चांगलेच झाले आहे. बीसीसीआयच्या मुलाखतीतही हे दिसून आले. दोघेही अनेक गोष्टींवर हसताना दिसले.
याच मुलाखतीत गंभीरने एक मोठा खुलासा करताना सांगितले की, काही वर्षांपूर्वी तो न्यूझीलंडच्या दौऱ्यावर हनुमान चालीसा वाचत असे. यानंतर कोहलीने सांगितले की, एका मालिकेत त्यानेही भगवान शिवाच्या नावाचा जप केला होता.
२००९ मध्ये, भारतीय संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेला होता, जिथे दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी आणि ५ एकदिवसीय सामने खेळले गेले. त्या दौऱ्याची आठवण करून देताना गंभीर म्हणाला की, तो फलंदाजी करताना हनुमान चालिसाचा पाठ करत असे. विश्रांतीच्या वेळीही हनुमान चालीसा ऐकून त्याचा उत्साह भरून यायचा.
२००९ च्या या कसोटी मालिकेत गंभीर सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्या मालिकेत त्याने ६ डावात ८९ च्या उत्कृष्ट सरासरीने ४४५ धावा केल्या. या काळात त्याने २ शतके आणि एक अर्धशतकही झळकावले.
यानंतर गंभीरने २०१४ मधील भारत-ऑस्ट्रेलिया बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची आठवण करून देताना एक किस्सा सांगितला. तो म्हणाला की विराटने ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत त्या मालिकेत खूप धावा केल्या होत्या.
गंभीरने सांगितले की कोहली प्रत्येक चेंडूवर भगवान शिवाचा मंत्र जपत होता. कोहलीची ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडंशी होत असलेली टक्कर क्रिकेटप्रेमींना रोमांचित करत होती. २०१४ च्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये विराटने कांगारू संघाच्या गोलंदाजीवर अनेकदा वर्चस्व गाजवले होते. त्याने ४ सामन्यात ८६.५० च्या उत्कृष्ट सरासरीने ६९२ धावा केल्या. या काळात त्याने ४ शतकी खेळीही खेळल्या होत्या.