मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  India Head Coach : गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा हेड कोच? लवकरच होऊ शकते घोषणा

India Head Coach : गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा हेड कोच? लवकरच होऊ शकते घोषणा

May 17, 2024 09:54 PM IST

Team India Head Coach : टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकाचा शोध वेगाने सुरू झाला आहे. अलीकडेच न्यूझीलंडचे दिग्गज स्टीफन फ्लेमिंग हे प्रशिक्षकपदाचे दावेदार असल्याचे बोलले जात होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज रिकी पाँटिंगचेही नाव पुढे आले.

India Head Coach : गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा हेड कोच? लवकरच होऊ शकते घोषणा
India Head Coach : गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा हेड कोच? लवकरच होऊ शकते घोषणा (PTI)

Team India Head Coach : टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपणार आहे. आगामी टी-20 वर्ल्डकप हा अमेरिकेत आणि वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे. या T20 विश्वचषकानंतर राहुल द्रविड यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अशा स्थितीत टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकाचा शोध वेगाने सुरू झाला आहे. अलीकडेच न्यूझीलंडचे दिग्गज स्टीफन फ्लेमिंग हे प्रशिक्षकपदाचे दावेदार असल्याचे बोलले जात होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज रिकी पाँटिंगचेही नाव पुढे आले. 

गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा हेड कोच?

पण आता माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरकडे टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची बातमी समोर येत आहे. 

टी-20 विश्वचषक २०२४ च्या समाप्तीनंतर, राहुल द्रविडचा टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्याच्यानंतर नवीन प्रशिक्षकाचा कार्यकाळ १ जुलैपासून सुरू होणार आहे.

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या एका रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे, की गौतम गंभीरने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारावी, यासाठी बीसीसीआयने त्याच्याशी संपर्क साधला आहे. गंभीर सध्या आयपीएल २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटर आहे. हंगाम संपल्यानंतर बीसीसीआयचे अधिकारी गंभीरशी या विषयावर मोकळेपणाने चर्चा करतील, असेही यात म्हटले आहे.

आयपीएल २०२४ चा अंतिम सामना २६ मे रोजी होणार आहे, तर BCCI ने प्रशिक्षक पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ मे निश्चित केली आहे.

गौतम गंभीरला कोचिंगचा अनुभव नाही

दरम्यान, या सर्वांमध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, गौतम गंभीरला आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत स्तरावर कोचिंगचा अनुभव नाही. तो २०२२-२०२३ मध्ये लखनौ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक होता आणि आता २०२४ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सच्या स्टाफचा भाग आहे. 

जोपर्यंत गंभीर LSG सोबत होता तोपर्यंत त्याचा संघ दोन्ही वेळा प्लेऑफमध्ये पोहोचला होता, तर आता IPL २०२४ मध्ये त्याने KKR ला टेबल टॉपर बनण्यास मदत केली आहे.

राहुल द्रविडने नकार दिला 

वनडे वर्ल्डकप २०२३ संपल्यानंतर राहुल द्रविडचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळदेखील संपला होता. पण काही अडचणींमुळे राहुल द्रविडचा प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ वाढवण्यात आला होता, जो ३० जून रोजी संपेल. 

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहण्याची आपली कोणतीही इच्छा नसल्याचे द्रविडने स्पष्ट केले आहे. अनेक वरिष्ठ खेळाडूंनी त्याला किमान कसोटी फॉरमॅटमध्ये प्रशिक्षक म्हणून कायम ठेवण्याची मागणी केली होती, पण द्रविडने आधीच निर्णय घेतला आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४