Gautam Gambhir Press Conference : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत भारतीय संघाचा दारुण पराभव झाला आहे. ऑस्ट्रेलियाने ५ सामन्यांची मालिका ३-१ ने जिंकली. या मालिकेत टीम इंडियाचे दोन प्रमुख फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा अपयशी ठरले. रोहितने तीन सामन्यांत केवळ ३१ धावा केल्या. विराटने एका डावात शतक झळकावले पण उर्वरित ८ डावात त्याला केवळ ९० धावा करता आल्या. २०१४-१५ नंतर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका गमावली आहे.
सिडनी कसोटीनंतर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर पत्रकार परिषदेला पोहोचला. येथे त्याला खेळाडूंच्या भवितव्याबाबत विचारण्यात आले. याच्या उत्तरात गंभीर म्हणाला, की मी कोणत्याही खेळाडूच्या भविष्यावर भाष्य करू शकत नाही, ते त्यांच्यावर अवलंबून आहे. त्यांच्याकडे भूक आणि वचनबद्धता आहे. आशा आहे की ते भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यासाठी शक्य ते सर्व करतील.
भारतीय संघातील मोठे खेळाडू देशांतर्गत क्रिकेटपासून दूर राहतात. विराट कोहली एका दशकापासून रणजी ट्रॉफी खेळलेला नाही. देशांतर्गत क्रिकेट खेळण्याबाबत गंभीर म्हणाला, प्रत्येकाने उपलब्ध असल्यास देशांतर्गत क्रिकेट खेळावे अशी माझी इच्छा आहे. जर तुम्ही कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी वचनबद्ध असाल तर देशांतर्गत क्रिकेट खेळा. तुम्ही असे न केल्यास, तुम्हाला हवे तसे परिणाम कधीच मिळणार नाहीत.
विराट कोहलीची बॅट बऱ्याच दिवसांपासून शांत आहे. २०२० पासून विराटने ३९ कसोटी सामने खेळले असून यामध्ये त्याच्या नावावर ३०.७२ च्या सरासरीने २०२८ धावा आहेत. आघाडीच्या फलंदाजांपैकी चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, मयंक अग्रवाल आणि हनुमा विहारी यांची या काळात त्याच्यापेक्षा वाईट सरासरी आहे. हे चारही फलंदाज संघातून बाहेर झाले आहेत. २०२४ पासून, रोहित शर्माने २४.७६ च्या सरासरीने धावा केल्या आहेत तर विराटची सरासरी २३.१५ आहे.
संबंधित बातम्या