Gautam Gambhir Travel India A Tour of England : भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडचा पराभव करून चॅम्पियन्स ट्रॉफी २०५ चे विजेतेपद पटकावले . आता टीम इंडिया पुढील दोन महिने कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळणार नाही. कारण २२ मार्च ते २५ मे या कालावधीत संपूर्ण भारत IPL २०२५ चा थरार अनुभवणार आहे.
या दरम्यान, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर भारत अ संघासोबत इंग्लंडला रवाना होणार असल्याची बातमी समोर आली आहे. जून-जुलै महिन्यात भारताला इंग्लंडसोबत ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे.
ही मालिका २० जूनपासून सुरु होणार आहे. भारत-इंग्लंड कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी गौतम गंभीर 'भारत अ' संघासह इंग्लंडला भेट देणार आहे. भारत 'अ' संघाला प्रशिक्षक नाही, त्यामुळे गौतम गंभीर 'इंडिया 'अ' संघासोबत केवळ समालोचक म्हणून जाणार की व्हीव्हीएस लक्ष्मण या संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
लक्ष्मण सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये क्रिकेट प्रमुख पदावर कार्यरत आहेत. गंभीर इंग्लंड दौऱ्यावर गेला तर परदेश दौऱ्यावर प्रथमच असेल जेव्हा वरिष्ठ संघाचे प्रशिक्षक 'इंडिया अ' सोबत उपस्थित असतील.
सूत्रांच्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून परतल्यानंतर गौतम गंभीर बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांशी सतत चर्चा करत आहे. गंभीरने स्वतः 'इंडिया अ' संघासोबत इंग्लंडला जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे, जेणेकरून त्याला राखीव खेळाडूंचीही कल्पना येईल.
याशिवाय गंभीरने पुढील २ वर्षांचा रोडमॅप तयार करण्यास सुरुवात केली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, २०२६ चा टी-20 वर्ल्ड कप आणि २०७ एकदिवसीय वर्ल्ड कप या मोठ्या स्पर्धा पुढील २ वर्षांत खेळल्या जाणार आहेत.
संबंधित बातम्या