चेन्नई कसोटीत भारतीय संघाने बांगलादेशचा २८० धावांनी पराभव केला. बांगलादेशविरुद्ध भारताचा धावांच्या बाबतीत हा मोठा विजय होता. तसेच कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाचा हा १७९ वा विजय आहे.
यानंतर आता, ९२ वर्षांनंतर पहिल्यांदाच असे घडले आहे, की कसोटी क्रिकेटमध्ये भारताच्या विजयाची संख्या त्याच्या पराभवापेक्षा जास्त आहे.
गौतम गंभीरचा प्रशिक्षक म्हणून हा पहिलाच कार्यकाळ असून त्याच्या प्रशिक्षणात भारताने विजयाने मालिका सुरू केली. भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर प्रशिक्षक गंभीरची प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे.
भारतीय संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir Instagram Story) बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर खूप आनंदी आहे. त्याने आपल्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करून भारतीय संघाचे विजयाबद्दल अभिनंदन केले. पहिली कसोटी जिंकल्यानंतर गंभीरने रोहित शर्मा आणि अश्विनसह सर्व खेळाडूंचे कौतुक केले.
गंभीरने टीम इंडियाच्या खेळाडूंचे २ फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत बुमराह-रोहितपासून अश्विन जडेजासह अनेक खेळाडू दिसत आहेत. दुसऱ्या फोटोत त्याने भारतीय खेळाडूंच्या फोटोंसह कॅप्शनमध्ये लिहिले, की A fantastic start! Well done boys!
तत्पूर्वी, भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी टीम इंडियाने २८० धावांनी जिंकली. या सामन्याचा निकाल चौथ्या दिवशीच लागला. लंचपूर्वी बांगलादेशचा संघ २३४ धावांवर गडगडला.
आर अश्विन भारताच्या विजयाचा हिरो ठरला, त्याने दुसऱ्या डावात ६ विकेट्स घेतल्या आणि या सामन्याच्या पहिल्या दमदार फलंदाजी करत शतकही झळकावले.
अश्विनचे शतक (११३) आणि रवींद्र जडेजाच्या (८६) धावांच्या बळावर भारताने पहिल्या डावात ३७६ धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ पहिल्या डावात अवघ्या १४९ धावांत सर्वबाद झाला.
भारताकडून पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. अशा प्रकारे टीम इंडियाला पहिल्या डावात १४९ धावांची आघाडी मिळाली.
यानंतर दुसऱ्या डावात भारताने ४ बाद २८७ धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर बांगलादेशला ५१५ धावांचे लक्ष्य मिळाले, ज्याचा पाठलाग करण्यात बांगलादेशचा संघ अपयशी ठरला आणि चौथ्या दिवशी २३४ धावांवर सर्वबाद झाला.