भारतीय क्रिकेट संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ०-३ असा पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवानंतर भारतीय संघासमोर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठण्याचे मोठे आव्हान बनले आहे. आता भारतीय संघाला अंतिम फेरीत जाण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत ४-० असा विजय आवश्यक आहे.
अशातच आता, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी आज (११ नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेतली. गंभीरला बरेच प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांना गंभीर यांनी मोकळेपणाने उत्तरे दिली.
रोहित शर्मा पहिल्या कसोटीत खेळणार की नाही, यावर गंभीर म्हणाला, 'रोहित शर्माबाबत अद्याप कोणतीही माहिती आलेली नाही. तो उपलब्ध होईल अशी आशा आहे. मालिका सुरू होण्यापूर्वी तुम्हाला सर्व काही कळेल.
रोहित शर्मा उपलब्ध नसल्यास, केएल राहुल आणि अभिमन्यू इसवरन हे आमच्यासाठी सलामीचे पर्याय आहेत. मी तुम्हाला प्लेइंग-११ बद्दल सांगू शकत नाही, आम्ही सर्वोत्तम संयोजनासह जाऊ. बुमराह उपकर्णधार आहे. त्यामुळे रोहितच्या अनुपस्थितीत तो नक्कीच कर्णधार असेल.
केएल राहुलबद्दल गौतम गंभीर म्हणाला, 'केएल राहुल ओपन करू शकतो, तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो, तो सहाव्या क्रमांकावरही फलंदाजी करू शकतो. ही चांगली गोष्ट आहे, बरेच खेळाडू असे पर्याय देऊ शकत नाहीत.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू इसवरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.
राखीव : मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद.
२२-२६ नोव्हेंबर: पहिली कसोटी, पर्थ
६-१० डिसेंबर: दुसरी कसोटी, ॲडलेड
१४-१८ डिसेंबर: तिसरी कसोटी, ब्रिस्बेन
२६-३० डिसेंबर: चौथी कसोटी, मेलबर्न
०३-०७ जानेवारी: पाचवी कसोटी, सिडनी