Asia Cup 2023: भारताचा स्टार क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांच्यातील वाद काही नवा नाही. गौतम गंभीरनं अनेकदा धोनीच्या नेतृत्त्वाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र, यावेळी गौतम गंभीरनं धोनीवर टीका न करता त्याचे कौतुक केले आहे, हे ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. धोनी हा भारतीय संघातील उत्कृष्ट खेळाडू होता, असे गंभीरनं एका कार्यक्रमात म्हटले आहे.
आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकणारा धोनी एकमेव कर्णधार आहे. धोनीच्या नेतृत्त्वात भारताने अनेक मालिका खिशात घातल्या आहेत. दरम्यान, २००४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या धोनीवर २००७ मध्ये कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली. यानंतर धोनीनं भारतीय संघाला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवलं. आशिया चषकातील अंतिम सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेचा १० विकेट्सनं धुव्वा उडवत एकतर्फी सामना जिंकला. याबाबत बोलताना गौतम गंभीरनं धोनीचं तोंडभरून कौतूक केलंय.
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना गंभीर म्हणाला की, "एमएस धोनी भारतीय संघाचा कर्णधार नसता तर, त्यानं तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत आणखी धावा केल्या असत्या.परंतु, त्यानं भारतीय संघासाठी आणि संघाला ट्ऱॉफी जिंकवून देण्यासाठी आपल्या धावांचं बलिदान दिलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त १५ खेळाडू आहेत, ज्यांनी १० हजार धावांचा टप्पा ओलांडलाय.यातील बहुतांश खेळाडू वरच्या फळीत फलंदाजी करायचे."
पुढे गंभीर म्हणाला की, “मधल्या फळीत आणि खालच्या फळीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे. धोनीनं त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली. मात्र, त्यानंतर त्यानं पाचव्या, सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर फलंदाजी केली. धोनीच्या नेतृत्त्वात भारताने २००७ मध्ये टी-२० विश्वचषक, २०११ मध्ये एकदिवशीय विश्वचषक आणि २०१३ मध्ये चॅम्पियन ट्रॉफी जिंकली.”as
महेंद्र सिंह धोनीनं ३५० एकदिवसीय, ९० कसोटी आणि ९८ टी-२० सामन्यात भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. कसोटी क्रिकेटमध्ये धोनीनं ४ हजार ८७९ धावा केल्या आहेत. ज्यात ६ शतक, एक द्विशतक आणि ३३ अर्धशतकांचा समावेश आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर एकूण १० हजार ७७३ धावांची नोंद आहे. मध्ये १० शतक, ७९ अर्धशतकांचा समावेश आहे. तर, टी-२० क्रिकेटमध्ये त्यानं एकूण १ हजार ६१७ धावा केल्या आहेत.