टी-20 विश्वचषक २०२४ नंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा कार्यकाळ संपत आहे. द्रविडनंतर गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक बनू शकतो, अशी चर्चा आहे. गंभीरला मुख्य प्रशिक्षक बनवण्याबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अद्याप या विषयावर कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. बीसीसीआयला गंभीरच्या आयपीएलमधील प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाच्या अनुभवाचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे. गंभीर प्रशिक्षक होण्यापूर्वी, त्याची एकूण संपत्ती किती आहे आणि त्याच्याकडे किती मालमत्ता आहे हे जाणून घेऊया.
गौतम गंभीर हा पिनॅकल स्पेशालिटी व्हेइकल्स, क्रिकप्ले आणि रॅडक्लिफ लॅबचा ब्रँड ॲम्बेसेडर आहे आणि या कंपन्यांमध्ये त्याचे शेअर्सही आहेत. त्याची एकूण संपत्ती अंदाजे २५ मिलियन्स यूएस डॉलर आहे, जी भारतीय चलनात सुमारे २०८ कोटी रुपयांच्या आसपास आहे. त्याच्या कारकिर्दीत तो अनेक आयपीएल संघांसाठीही खेळला आहे.
सुरुवातीला, दिल्ली कॅपिटल्सने गंभीरला २.९ कोटी रुपयांना विकत घेतले आणि २०११ मध्ये तो KKR फ्रँचायझीमध्ये सामील झाला. यापूर्वी KKR मध्ये त्याचा आयपीएल पगार ११ कोटी रुपये होता, पण २०१२ आणि २०१४ च्या यशानंतर त्याचा पगार १२.५ कोटी रुपये झाला.
पण २०१८ मध्ये निवृत्तीनंतर तो हिंदी आणि इंग्रजीमध्ये क्रिकेट कॉमेंट्री करूनही कमाई करत आहे.
गौतम गंभीर हा भारतीय संघाचा सर्वात प्रतिभावान खेळाडू होता. त्याने सुमारे १५ वर्षे भारताचे प्रतिनिधित्व केले आणि या काळात त्याला 'मोठा मॅच प्लेयर' देखील म्हटले गेले. २०११ च्या विश्वचषकात श्रीलंकेविरुद्ध ९७ धावांची खेळी, तर २००७ च्या T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात त्याने पाकिस्तानविरुद्ध ५४ चेंडूत ७५ धावांची अप्रतिम आणि महत्त्वाची खेळी खेळली होती.
भारतासाठी, गंभीरने १४७ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५,२३८ धावा केल्या, ज्यात ११ शतके आणि ३४ अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय त्याने ५८ कसोटी सामन्यांमध्ये ४,१५४ धावा केल्या ज्यात ९ शतके आणि २२ अर्धशतकांचा समावेश आहे. गौतम गंभीरने टी-20 फॉरमॅटमध्ये भारतासाठी ३७ सामन्यांत ९३२ धावा केल्या आहेत.
संबंधित बातम्या