न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील लाजिरवाण्या पराभवानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर टीकाकारांच्या निशाण्यावर आहेत. गौतम गंभीरच्या कामगिरीवर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचेही लक्ष असणार आहे. ऑस्ट्रेलियात होणारी पाच कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी गौतम गंभीर यांचे भवितव्य ठरवेल. याशिवाय, त्यांच्याजवळील काही अधिकारही काढून घेतले जाऊ शकतात.
गौतम गंभीरने संघाची धुरा हाती घेतल्यापासून संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावा लागत आहे. भारताला पहिल्यांदाच तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत क्लीन स्वीपला सामोरे जावे लागले आहे. तर, त्याआधी भारताला श्रीलंकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत पराभव पत्करावा लागला. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरसाठी ऑस्ट्रेलिया दौरा अत्यंत महत्त्वाचा असेल. या दौऱ्यात भारतीय संघ चांगली कामगिरी करू शकला नाही तर बीसीसीआय त्यांच्याविरोधात कठोर पावले उचलू शकते.
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मागील चार कसोटी मालिका जिंकल्या आहेत. त्यापैकी दोन मालिक ऑस्ट्रेलियात खेळल्या गेल्या आहेत. अशा तऱ्हेने गौतम गंभीरला आपला दर्जा उंचावायचा असेल तर ही कसोटी मालिका जिंकावी लागेल. भारताला कसोटी मालिका ४-० किंवा ५-० ने जिंकली तरच त्यांना डब्लूटीसीच्या अंतिम फेरीत स्थान मिळवता येऊ शकते.
पीटीआयच्या रिपोर्टनुसार, रवी शास्त्री आणि राहुल द्रविड यांच्या तुलनेत गौतम गंभीर यांच्याकडे उत्तम खेळाडू आहेत. गौतम गंभीर खेळाडूंचीही निवड करू शकतात, जे अधिकार शास्त्री आणि द्रविड यांच्याकडे नव्हते. बीसीसीआयच्या नियमांनुसार, निवडीच्या बाबींमध्ये मुख्य प्रशिक्षकांकडे कोणतेही अधिकार नसतात. परंतु बोर्डानं ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे महत्त्व लक्षात घेऊन अपवाद केला आणि गंभीरला निवड बैठकीचा भाग होण्याची परवानगी दिली.
बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयला सांगितले की, ‘ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे महत्त्व लक्षात घेऊन मुख्य प्रशिक्षकांना या दौऱ्याला उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती. रोहित शर्माने टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सूर्यकुमार यादवची भारताच्या टी-२० कर्णधारपदी निवड आणि हार्दिक पांड्याला कर्णधार न बनवल्यानंतर गंभीरने जुलैमध्ये निवड झाल्यापासून निवडीच्या बाबींमध्येही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.’
गौतम गंभीरने ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेच्या निवडीवर केवळ नऊ प्रथम श्रेणी सामने खेळलेल्या हर्षित राणाचा आग्रह धरला, ज्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. याशिवाय, ऑस्ट्रेलियात अनधिकृत कसोटी मालिका खेळणाऱ्या भारत ‘अ’ संघात त्याचा समावेश करण्यात आला होता. दिल्लीचा हा वेगवान गोलंदाज ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी तयार नव्हता. कारण त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीपूर्वी मुंबईत भारतीय संघासोबत सराव केला होता आणि यापूर्वी त्याने आसामविरुद्ध घरच्या मैदानावर रणजी सामना खेळला होता. नितीश रेड्डीला संघात सामावून घेण्यात गंभीरने महत्त्वाची भूमिका बजावली. कारण त्यांना वाटले की,तो हार्दिक पांड्यासारखा वेगवान अष्टपैलू खेळाडू आहे.